Mumbai : मुदतीआधीच बेलासिस उड्डाणपुलाचे काम फत्ते! मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेवमधील वाहतूककोंडी फुटणार

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणारा १३० वर्षे जुना बेलासिस पुलाची पुनर्बाधणी करण्यात आली आहे. बीएमसीने मुदतीपेक्षा ४ महिने आधीच, अवघ्या १५ महिने ६ दिवसांत काम पूर्ण केले.
Mumbai : मुदतीआधीच बेलासिस उड्डाणपुलाचे काम फत्ते! मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेवमधील वाहतूककोंडी फुटणार
Published on

मुंबई : मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणारा १३० वर्षे जुना बेलासिस पुलाची पुनर्बाधणी करण्यात आली आहे. स्लॅब कास्टिंग, दोन्ही पोहोच मार्गांची कामे पालिकेने तर रेल्वे हद्दीत गर्डर टाकणे आदी कामे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहेत. बेलासिस पुलाच्या कामास प्रत्यक्षात १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरुवात झाली आणि अवघ्या १५ महिने ६ दिवसांत काम पूर्ण झाले. उल्लेखनीय म्हणजे, बृहन्मुंबई महानगरपालिकेने हे काम निविदेतील मुदतीपेक्षा ४ महिने आधीच पूर्ण केले आहे.

रेल्वेची एनओसी मिळताच पूल खुला होणार

बेलासिस पुलाची अंतिम कामे ६ जानेवारी २०२६ रोजी पूर्ण झाली आहेत. लोड टेस्ट, संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र, सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. आता रेल्वे विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने बेलासिस पूल वाहतुकीस खुला करण्यात येईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

पूर्व पश्चिमेला जोडणार!

दक्षिण मुंबईतील जहांगीर बोमन बेहराम मार्गावरील (पूर्वीचे बेलासिस रोड) बेलासिस पूल हा मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव या भागांना लोहमार्गावरून पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. बेलासिस पुलाच्या पुनर्बांधणीमुळे दोन वर्षापासून बाधित झालेली पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठीची सुविधा पुन्हा प्रस्थापित होणार आहे. बेलासिस पूल कार्यान्वित झाल्यावर जहांगीर बोमन बेहराम मार्ग (पूर्वीचे बेलासिस रोड), दादासाहेब भडकमकर मार्गावरील (ग्रॅन्ट रोड), विशेषतः पठ्ठे बापूराव मार्ग व महालक्ष्मी स्‍थानक पुलावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

असा आहे बेलासिस पूल !

बेलासिस पुलाची एकूण लांबी ३३३ मीटर आहे. त्यापैकी १३८.३९ मीटर पूर्वेला आणि १५७.३९ मीटर पश्चिमेला आहे. तर, रेल्वे हद्दीत ३६.९० मीटर लांब आहे. वाहतूक मार्ग लांबी ७ मीटर असून दोन्ही बाजूला पुरेशा रूंदीचे पदपथ अशी पुलाची आखणी आहे.

...म्हणून काम नियोजित कालावधीपूर्वीच पूर्ण

मुंबई सेंट्रल स्थानकानजीक रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन बेलासिस उड्डाणपूल धोकादायक जाहीर झाल्यानंतर त्याच्या पुनर्बांधणीचे काम महानगरपालिकेने हाती घेतले. महानगरपालिका पूल विभाग व रेल्वे विभागाचे अभियंते पहिल्या दिवसापासूनच पुलाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यासाठी संपूर्ण कामाची विभागणी करून सूक्ष्म नियोजन करण्यात आले. कामकाजाच्या उपभागांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली. तसेच, कोणत्याही परिस्थितीत कालमर्यादा पाळली जाईल, याची दक्षता अभियंत्यांनी घेतली. या प्रयत्नात स्थानिक प्रशासकीय विभाग कार्यालय, वाहतूक पोलीस अधिकारी यांची मोलाची साथ लाभली. या पुलाचे काम पूर्ण करणे आव्हानात्मक होते. कामाची अंमलबजावणी सुरू असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यात 'बेस्ट' वाहिन्यांचे स्थलांतरण, पूल बांधकामास अडथळा ठरणारी १३ बांधकामे हटवून पर्यायी घरांचे वाटप करणे, पुलानजीकच्या एका गृहनिर्माण संस्थेची बाधित होणारी सीमाभिंत हटविणे, उच्च न्यायालयासमोरील खटला आदींचा समावेश होता. त्यावर मात करत प्रकल्प कामकाजास कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता सर्व अभियंत्यांनी घेतली. सर्व कामाची आखणी नियोजनबद्धपणे केल्याने पावसाळ्याच्या ४ महिन्यांच्या कालावधीत देखील काम अविरत सुरू होते. त्यामुळे बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करण्यात यश मिळाले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पूल खात्यामार्फत महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा, विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मुंबईकर नागरिकांचा प्रवासात कमीत कमी वेळ खर्ची व्हावा, यासाठी विविध ठिकाणी उड्डाणपूल उभारणे, लोहमार्गावर तुळया टाकून पूल उभारणे, रस्त्यांची गुणवत्ता उत्तम असावी यासाठी सिमेंट क्राँकीटच्या रस्त्यांची बांधणी करणे आदी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in