वाढत्या उष्णतेत नागरिकांना ताडगोळ्यांचा गारवा

उन्हाळा सुरू झाला की सर्वांचीच पावले आईस्क्रीम, शीतपेये यांच्याकडे वळतात. मात्र क्षणिक गारवा देणाऱ्या या पदार्थांमुळे विविध आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
वाढत्या उष्णतेत नागरिकांना ताडगोळ्यांचा गारवा
Published on

उन्हाळा सुरू झाला की सर्वांचीच पावले आईस्क्रीम, शीतपेये यांच्याकडे वळतात. मात्र क्षणिक गारवा देणाऱ्या या पदार्थांमुळे विविध आरोग्याच्या समस्या उद्भवतात. अशावेळी शरीराची दाहकता कमी करणारे आणि आरोग्यदायी असे उपयुक्त फळ म्हणजे ताडगोळे. उष्णतेचा उच्चांक वाढत असताना लिंबू सरबत, कलिंगडासोबत ताडगोळ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी मिळत आहे. शहरातील बाजारपेठेत तसेच रस्त्याच्या कडेला ताडगोळे विक्री होत असून उन्हाने त्रस्त नागरिकांकडून ताडगोळे अथवा नीरा पेयाचा आस्वाद घेतला जात आहे.

उन्हाचा दाह कमी करण्यासाठी ऊसाचा रस, लिंबू सरबत, कैरीच पन्हे, शहाळे असे अनेक पर्याय उन्हाळ्यात लोक निवडतात. परंतु सध्या मुंबईसह अन्य शहरात उन्हाचा दाह वाढताना नागरिक ताडगोळ्यावर ताव मारताना पहायला मिळत आहे. ताडाच्या झाडाला येणाऱ्या ताडगोळा फळाचे शास्त्रीय नाव बोरासस फ्लॅबिलिफर असे आहे. हे फळ महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी प्रामुख्याने ताडाची लागवड केली जाते.

बंगालमध्ये ‘ताल’, तेलगूमध्ये ‘ताती मुंजलू’, तामिळमध्ये ‘नुन्गू’, इंग्रजीमध्ये ‘आइस अँपल’ तर हिंदीमध्ये ‘तारी’ या नावाने ताड ओळखले जाते. या झाडाची पाने सदाबहार हिरवीगार आणि आकाराने मोठी असतात. एप्रिल महिन्याच्या अखेरपासूनच शहरातल्या बाजारपेठेत अनेक ठिकाणी ताडगोळ्याच्या विक्रीला उधाण आले आहे. दरम्यान, वसई, पालघर, ठाणे, नवी मुंबई शहरात ताडगोळे विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून १ डझन ताडगोळ्यांची किंमत ८० ते १०० रुपयांपर्यंत आहे.

आरोग्यदायी फायदे

- ताडगोळा हे फळ पाणीदार असून ते कापायची गरज भासत नाही. हे फळ थंड असल्यामुळे उन्हाळ्यात खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते.

- ताडगोळ्यात खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि ए, बी, सी या जीवनसत्त्वांचा भरपूर साठा असल्यामुळे एकंदरीतच शरीराला ते अतिशय उपयुक्त ठरते.

- उन्हाळ्यात उष्णतेमुळे उद्भवणार्‍या विविध आजारांवर हे ताडगोळे अत्यंत उपयोगी ठरतात.

logo
marathi.freepressjournal.in