

मुंबई : वर्षानुवर्षे वीजबिलाची थकबाकी प्रलंबित असलेल्या ग्राहकांना दिलासा देत बेस्ट समितीने बुधवारी अभय योजनेला मंजुरी दिली. या योजनेमुळे सुमारे १६ हजार वीज ग्राहकांना थकीत रकमेची केवळ मूळ रक्कम भरून आपले जुने मीटर पुन्हा कार्यान्वित करता येणार आहे. मूळ थकबाकी वसूल झाल्यानंतर त्यावरील व्याज आणि विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. या योजनेतून बेस्टला सुमारे ३९ कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
ऑक्टोबर २००६ ते ३० जून २०२३ या कालावधीत वीजबिल न भरल्यामुळे ज्या ग्राहकांचे वीज मीटर काढून घेण्यात आले आहेत, अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मीटर काढण्यात आलेल्या तारखेपर्यंतची मूळ थकीत रक्कम भरल्यानंतर त्यावरील व्याज आणि विलंब शुल्क माफ केले जाणार आहे. ही योजना १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत लागू राहणार आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून थकीत असलेल्या वीजबिलांचा निपटारा करण्याची संधी ग्राहकांना मिळणार असून, दुसरीकडे बेस्टच्या जुन्या थकबाकीच्या वसुलीलाही चालना मिळणार आहे.
जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा वापर
‘अभय योजने’चा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा यासाठी बेस्टकडून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. वृत्तपत्रांमधील जाहिराती, पोस्टर्स तसेच वीजबिलांसोबत देण्यात येणाऱ्या संदेशांद्वारे ग्राहकांना योजनेची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय एसएमएस आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे.