आजपासून 'अटल सेतू'वर धावणार ‘बेस्ट’ची एसी बस; भाडं किती, मार्ग कोणता?

दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणाऱ्या अटल सेतूवर गुरुवारपासून एसी बस धावणार
आजपासून 'अटल सेतू'वर धावणार ‘बेस्ट’ची एसी बस; भाडं किती, मार्ग कोणता?

मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी ‘बेस्ट’ उपक्रमाने बसेसवर ‘एअर प्युरीफायर’ बसवले आहेत. आतापर्यंत २४० बसेसवर ‘एअर प्युरीफायर’ बसवण्यात आले असून पुढील १५ दिवसांत उर्वरित ६० बसेसवर ते बसवण्यात येणार आहेत. दरम्यान, दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणाऱ्या अटल सेतूवर गुरुवारपासून एसी बस धावणार असून मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बुधवारी कुलाबा बेस्ट भवन येथे या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

प्रवाशांकडून वारंवार करण्यात येणाऱ्या मागणीमुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या ‘अटल सेतू’ अर्थात शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर मार्गावरही आता ‘बेस्ट’ची एसी बस धावणार आहे. यामध्ये जागतिक व्यापार केंद्र आणि कोकण भवन, सीबीडी बेलापूर दरम्यान एसी बस (मार्ग क्र. एस-१४५) गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये किमान भाडे ५० तर कमाल भाडे २२५ रुपये राहील. या मार्गावर सकाळी सीबीडी बेलापूर येथून आणि संध्याकाळी जागतिक व्यापार केंद्र येथून बस चालवण्यात येतील. या बसचा प्रवास मार्ग जागतिक व्यापार केंद्र - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मंत्रालय) - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (जीपीओ) - पूर्व मुक्त मार्ग - अटल सेतू उड्डाणपूल - उलवे नोड - किल्ले गावठाण - बामण डोंगरी रेल्वे स्थानक - कोकण भवन, सीबीडी बेलापूर असा राहील.

प्रदूषण नियंत्रणासाठी 'बेस्ट'ची धाव -

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याने पालिकेचे टेन्शन वाढले आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयानेदेखील पालिकेला अनेक वेळा फटकारले. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असून आयआयटी, मुंबईसारख्या सहा तज्ज्ञ एजन्सी हवा प्रदूषण रोखण्यासाठी काम करीत आहेत. यामध्ये मुंबईत वाहनांपासून निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी वाहनांमध्ये ‘व्हेइकल माऊंटेड फिल्टर’ म्हणजेच धूर फिल्टर यंत्रणा बसवण्यात येणार आहे. शिवाय आता बेस्ट गाड्यांच्या टपावर पुढच्या बाजूला ‘एअर प्युरिफायर’ यंत्रणा बसवण्यात आली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे आज लोकार्पण करण्यात आले. यामध्ये १०० युनिट महिंद्रा अँड महिंद्रा तर १०० युनिट बीपीसीएलकडून बसवण्यात येतील. यावेळी अविनाश ढाकणे, सदस्य सचिव (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ) मिनेश पिंपळे, उपायुक्त (पर्यावरण, बृहन्मुंबई महानगरपालिका) आदी मान्यवर उपस्थित होते.

ही आहेत यंत्रणेची वैशिष्ट्ये

ही यंत्रणा हवेमध्ये तरंगणारे कण काढून टाकेल. ‘मोबाईल एअर प्युरिफायर’ म्हणून ही यंत्रणा काम करेल. प्रतिदिन १२ ते १५ ग्रॅम तरंगणारे कण गोळा करणार. ५० ते ६० हजार घनमीटर हवा शुद्ध होणार. नैसर्गिक गतीवर चालल्यामुळे विजेची गरज नाही. ३ फिल्टरेशन स्तरापैकी २ थर ६ महिन्यांनी धुता येणार.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in