एकाच दिवशी हजार जणांवर ‘बेस्ट’ कारवाई! फुकट्या प्रवाशांकडून ५८ हजारांचा दंड वसूल

सुरक्षित, आरामदायी व स्वस्त प्रवास म्हणून आजही प्रवासी बेस्ट बसेसना पसंती देतात. मात्र काही प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे बेस्टच्या निदर्शनास आले
एकाच दिवशी हजार जणांवर ‘बेस्ट’ कारवाई! फुकट्या प्रवाशांकडून ५८ हजारांचा दंड वसूल

मुंबई : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. वर्षांच्या सुरुवातीलाच एकाच दिवशी तब्बल ९४५ फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारत तब्बल ५८ हजार ४५७ रुपये दंड वसूल केला. दरम्यान, आरामदायी, सुरक्षित प्रवास आणि स्वस्त प्रवास असलेल्या बेस्ट बसने तिकीट काढून प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने प्रवाशांना केले आहे.

सुरक्षित, आरामदायी व स्वस्त प्रवास म्हणून आजही प्रवासी बेस्ट बसेसना पसंती देतात. मात्र काही प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे बेस्टच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे विनातिकीट, अंतरापेक्षा जास्त प्रवास अशा लोकांविरोधात बेस्ट उपक्रमाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रवाशांची जादा गर्दी होणाऱ्या बस स्थानकांवर अतिरिक्त तिकीट निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘बेस्ट’च्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत यापूर्वी विनातिकीट प्रवाशांकडून प्रतिदिवशी सुमारे ७ हजार इतका दंड मिळत होता. मात्र आताच्या मोहिमेत उत्पन्नात प्रतिदिन ८ पटींपेक्षा जास्तीने वाढले आहे. दरम्यान, बसमधून प्रवास करताना योग्य तिकीट खरेदी करणे हे प्रत्येक प्रवाशाला बंधनकारक असून विनातिकीट प्रवास करणे हा सामाजिक गुन्हादेखील असल्याचे ‘बेस्ट’ने स्पष्ट केले आहे.

उत्पन्न वाढवण्यासाठी मोहीम

बेस्टमधून दररोज ३२ ते ३५ लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करतात. बस प्रवाशांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजुला याच गर्दीतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून उत्पन्नात घट होत असल्याचे बेस्ट प्रशासनाच्या निदर्शनास आले. यास्तव बेस्ट उपक्रमाने २०२४ वर्षाच्या सुरुवातीपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये विशेष पथके तयार करण्यात आली असून या पथकामध्ये एकूण ३८२ निरीक्षकांची तिकीट तपासणीकरिता नेमणूक करण्यात आली आहे.

२०० रुपये दंड किंवा कारावास!

सध्या बेस्ट उपक्रमाकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून देय असलेल्या प्रवास भाडे, अधिक प्रवासी भाड्याच्या रकमेच्या दहापट एवढी रक्कम दंड म्हणून आकारण्यात येतो. सदर दंड भरण्याचे नाकारल्यास, मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ४६० (ह) अन्वये एक महिन्यापर्यंत वाढवता येईल इतक्या कारावासाची किंवा २०० रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे देण्याची तरतूद आहे.

logo
marathi.freepressjournal.in