
राज्यात गणेशोत्सव सुरू झाला असून मुंबईत गणरायाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत आहेत. तसंच देश-विदेशातील अनेक पर्यटक खास गणेशोत्सवाला मुंबईला आवर्जून भेट देतात. गणेशोत्सवाला प्रत्येक वर्षी भाविकांची खूप गर्दी होतं असते. मुंबईत होणारी गर्दी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने नागरिकांसाठी अतिरिक्त बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशभक्त आणि पर्यटकांसाठी १९ ते २७ सप्टेंबर या काळात रात्रीच्या वेळी अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. रात्री कुलाबा परिसरातून उत्तर-पश्चिम मुंबईकडे गिरगाव, लालबाग, परळ, चेंबूरमार्गे या बस चालविण्यात येणार आहेत. बसमार्ग क्रमांक ४ मर्या, ७ मर्या, ८ मर्या, ए – २१, ए – ४२, ४४, ६६, ६९ व सी -४० या बसमार्गावर रात्रीच्या वेळीस अतिरिक्त बस फेऱ्या होणार , अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोकांनी लालबाग परिसरात गर्दी केली. त्यामुळे या मार्गावरील अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली . लालबाग परिसरात मंगळवारी पहाटे भाविकांची मोठ्याप्रमाणात गर्दी झाल्याने बेस्ट बस क्रमांक ६६ भारतमाता सिग्नलवरून चिंचपोकळी पुलाऐवजी करी रोड पुलामार्गे वळवण्यात आली.