बेस्ट बसमध्ये हळुहळू बोला; मोबाईलवर मोठ्याने बोलणे, गाणी ऐकणे पडणार महागात

मुंबईची दुसरी लाईफ लाईन म्हणून बेस्ट बसेसची ओळख आहे. सध्या बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या व भाडेतत्त्वावरील बसेसने दररोज ३५ लाख प्रवासी प्रवास करतात.
BEST
BEST

सध्या इंटरनेट मोबाईलचे युग असून, मोबाईल हा प्रत्येकाचा अविभाज्य भाग झाला आहे; मात्र हाच मोबाईल दुसऱ्यांसाठी त्रासदायक ठरत असल्याने यापुढे बेस्ट उपक्रमाच्या बसने प्रवास करताना मुखाने हळुहळू बोला, गाणी हळू आवाजात ऐका, नाही तर कारवाईला सामोरे जा, असा इशारा बेस्ट उपक्रमाने दिला आहे. दरम्यान, प्रवाशांना याबाबत तक्रारीसाठी हेल्पलाईन नंबर उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

मुंबईची दुसरी लाईफ लाईन म्हणून बेस्ट बसेसची ओळख आहे. सध्या बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या व भाडेतत्त्वावरील बसेसने दररोज ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या नवीन भाडेतत्त्वावरील बसेस इलेक्ट्रीक वातानुकूलित असल्याने दरवाजे खिडक्या बंद करणे गरजेचे आहे. अशातच शेजारील प्रवासी मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलत असेल किंवा गाणी ऐकत असेल, तर त्याचा त्रास दुसऱ्या प्रवाशांना होणे स्वाभाविक आहे. मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलणे गाणी ऐकणे अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसमध्ये मोठ्याने बोलणे व गाणी ऐकणे यावर बंदी घातली आहे. बेस्ट उपक्रमाच्या या नियमांचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्यास पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल, असा इशारा बेस्ट उपक्रमाने दिला आहे.

'अशी' होईल कारवाई!

बेस्ट उपक्रमाने प्रवाशांना मोबाईलवर इअरफोन शिवाय ऑडिओ किंवा व्हिडिओ बघण्यास तसेच मोबाईलवर मोठ्याने बोलण्यास बंदी घातली आहे. नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास प्रवाशांवर पोलीस कायद्यानुसार (कलम ३८/११२) नुसार कारवाई करण्यात येईल. याबाबतचे परिपत्रक बेस्टच्या सर्व बसेसमध्ये लवकरच लावण्यात येणार असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in