

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील बसेसचा समावेश करण्यात आला असून भाडेतत्त्वावरील बसेसचा अपघात होण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास धारावी बस आगारात मातेश्वरी कंपनीची बस आगारातील चौकीला धडकली. या घटनेत दोन कामगार जखमी झाले आहेत.
धारावी बस आगारात मातेश्वरी कंपनीची बस चालकाने ताब्यात घेतली. बस सुरू करून बस चौकीकडे आणत असताना ही बस चौकीला धडकली. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन बसचालकाने लगेच बस मागे घेतली, मात्र त्या चौकीवरील पत्रा त्या बसमध्ये अडकला व चौकीचा मोठा भाग खाली कोसळला. त्यामुळे त्या चौकीत बसलेले बेस्टचे दोन कर्मचारी जखमी झाले. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बेस्ट प्रशासनाकडून या अपघाताचा तपास करण्यात येत आहे.