कंत्राटदारांच्या सततच्या संपामुळे बेस्ट हवालदिल; आर्थिक नुकसानीसह बेस्टची प्रतिमा मलीन

प्रवासी सुविधेच्या नावाखाली आता भाडेतत्त्वावरील बसेस व कर्मचारी बेस्टच्या अंगलट आले आहे.
कंत्राटदारांच्या सततच्या संपामुळे बेस्ट हवालदिल; आर्थिक नुकसानीसह बेस्टची प्रतिमा मलीन

मुंबई : प्रवासी सुविधेच्या नावाखाली आता भाडेतत्त्वावरील बसेस व कर्मचारी बेस्टच्या अंगलट आले आहे. कंत्राटी कामगारांच्या सततच्या संपाचा फटका बेस्ट उपक्रमासह प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

दोन आठवड्यापूर्वी शिवाजी नगर बस डेपोतील बेस्टच्या टाटा मोटर्स लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला. आयत्यावेळी अन्य बस आगारातील स्वत:च्या बसगाड्या व कंत्राटदारांच्या बसगाड्या प्रवासी सेवेत आणाव्या लागल्या. बेस्ट बससेवा सुरळीत राहावी, यासाठी बेस्टने प्रयत्न केले, मात्र एका आगारातील संपामुळे प्रवासी वेठीस धरल्याने बेस्ट उपक्रमाची कंत्राटी पद्धत बेस्टच्याच अंगलट आली आहे. अचानक पुकारलेल्या संपामुळे बेस्ट उपक्रम हवालदिल झाला आहे.

कंत्राटदारांना वारंवार सूचना, अतिरिक्त दंड ठोठावून कंत्राटदार, कर्मचारी अचानक संपाची हाक देत आहेत. यामुळे बेस्टची जनमानसातील प्रतिमा खराब होत आहे. सध्या सहा कंत्राटदारांच्या माध्यमातून बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. परंतु वारंवार संपाची हाक देणाऱ्या कंत्राटी कामगारांमुळे बेस्टची नाकाबंदी झाली आहे.

बेस्ट उपक्रमाला नवीन बसेसचा पुरवठा करण्यासाठी नवीन कंत्राटदार बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहे. बेस्ट उपक्रमाकडे स्वत:चे अतिरिक्त चालक असून काही बसचालक कंत्राटदारांच्या बसगाड्या चालवत आहेत. भविष्यात बेस्टच्या स्वमालकीच्या बसेस उपलब्ध झाल्या नाही तर मात्र बेस्टचा डोलारा कंत्राटी कामगारांच्या हाती असेल, अशी भीती कायमस्वरूपी कामगारांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in