प्रवाशांना दिवाळीची बेस्ट ऑफर; नऊ रुपयांत पाच फेऱ्यांचा प्रवास

प्रवाशांना दिवाळीची बेस्ट ऑफर; नऊ रुपयांत पाच फेऱ्यांचा प्रवास

१२ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान कुठल्याही मार्गावर नऊ रुपयांता पाच बस फेऱ्यांचा प्रवास करता येणार आहे.

डिजिटल तिकीट प्रणालीला प्रवाशांचा अधिकाधिक प्रतिसाद मिळत असून आझादी का अमृत महोत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर आता दिवाळीसाठी विशेष ऑफर प्रवाशांसाठी उपलब्ध केली आहे. १२ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान कुठल्याही मार्गावर नऊ रुपयांता पाच बस फेऱ्यांचा प्रवास करता येणार आहे. प्रवाशांनी डिजिटल तिकीट प्रणाली पसंती द्यावी, या उद्देशाने सणासुदीच्या काळात विशेष ऑफर देण्यात येत असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

यंदाचा प्रत्येक सण उत्साहात साजरा होत असून प्रवाशांनाही सणासुदीच्या काळात बेस्ट उपक्रमाने विशेष ऑफर दिल्या आहेत. दिवाळी सणानिमित्त ही प्रवाशांसाठी बेस्ट ऑफर उपलब्ध केली आहे. १२ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ९ रुपयांत ५ फेऱ्यांचा प्रवास प्रवाशांना करता येणार आहे. यासाठी प्रवाशांनी चलो अॅप डाऊनलोड केल्यानंतर बस-पास पर्याय उपलब्ध होईल. बस-पास पर्याय उपलब्ध झाल्यानंतर त्या दिवाळी ऑफर पर्याय निवडल्यानंतर नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने ९ रुपये भरायचे आहेत. दिवाळी ऑफर हा पास मोबाईल अॅपवर उपलब्ध झाल्यानंतर संबंधित प्रवासी ९ रुपयांत ५ बस फेऱ्यांचा प्रवास करु शकणार आहे. दिवाळी ऑफर बस पास प्रवास करताना मोबाईल तिकीट कंटक्टर कडे धरल्यास तिकिट ग्राह्य धरले जाईल आणि प्रवासी प्रवास करु शकणार आहे, असे चंद्र यांनी सांगितले.

१२ लाख प्रवाशांनी घेतला लाभ

डिजिटल तिकीट प्रणालीला प्रवाशांनी पसंती दिली असून आझादी का अमृत महोत्सव, गणेशोत्सव व नवरात्रोत्सव या सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी विशेष ऑफर उपलब्ध केली होती. या कालावधीत १२ लाख प्रवाशांनी विशेष ऑफरच्या माध्यमातून प्रवास केला आहे. त्याशिवाय पर्यावरणाच्या दृष्टीने बेस्ट उपक्रमाने इलेक्ट्रीक वातानुकूलित बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या आहेत. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने डिजिटल तिकीट प्रणाली अंमलात आणली आहे. नवरात्रोत्सवात प्रवाशांसाठी विशेष ऑफर उपलब्ध केल्यानंतर एक लाखाहून अधिक प्रवाशांनी डिजिटल तिकीट प्रणालीला पसंती दिली आहे. आतापर्यंत ३० लाख प्रवाशांनी चलो अॅप डाऊनलोड केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in