फिटनेस प्रमाणपत्र आणि विम्याविना बेस्टच्या भाडेतत्त्वावरील ई-बसेसचा वापर; कामगार संघटनेचा आरोप

बेस्टकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या ई-बस फिटनेस प्रमाणपत्र आणि वैध विमा नसताना वापरल्या जात असल्याचा गंभीर आरोप कामगार संघटनेने केला आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : बेस्टकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या ई-बस फिटनेस प्रमाणपत्र आणि वैध विमा नसताना वापरल्या जात असल्याचा गंभीर आरोप कामगार संघटनेने केला आहे.

बेस्टने मार्च २०२३ पूर्वी अधिकाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी भाड्याने घेतलेल्या सर्व १४२ टाटा एक्स्प्रेस-टी इव्ही गाड्या फिटनेस प्रमाणपत्र आणि वैध विम्याविना रस्त्यावर धावत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बेस्ट किंवा महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, बेस्टने वृत्तसंस्थेला दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, या गाड्यांचे फिटनेस आणि विमा प्रमाणपत्र मिळवण्याची जबाबदारी गाड्या भाड्याने देणाऱ्या खासगी कंपनीची आहे.

बेस्टमधील एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, काही गाड्यांचे विमा आणि फिटनेस प्रमाणपत्र आठ महिन्यांपूर्वीच कालबाह्य झाले आहे. या गाड्या बेस्टच्या वाहतूक आणि वीज विभागातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी वापरल्या जात आहेत.

बेस्ट कर्मचारी संघटनेचे नेते शशांक राव यांनी मंगळवारी सांगितले की, “या गाड्यांमुळे उद्या काही अपघात झाला, तर जबाबदार बेस्ट अधिकारीच असतील. संस्थेने कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे.”

बेस्टमधील एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “मी आणि माझ्यासारखे अनेक कर्मचारी ही इलेक्ट्रिक गाड्या अधिकृत कामांसाठी- जसे की वीज खंडित झाल्यास दुरुस्तीसाठी- वापरतो. पण आता आम्हाला भीती वाटते. कारण, अपघात झाल्यास कंपनीच्या वाईट आर्थिक परिस्थितीमुळे आम्हाला कोणतीही नुकसानभरपाई मिळणार नाही.”

या गाड्यांसाठी जबाबदार बेस्टचे अतिरिक्त महाव्यवस्थापक (वाहतूक) श्रीनिवास राव तसेच टार्डेओ RTO चे प्रभारी अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत काळासकर यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ६२ नुसार, सर्व व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १४६ नुसार, रस्त्यावर धावणाऱ्या सर्व वाहनांचा तृतीय पक्ष विमा असणे अनिवार्य आहे.

नूतनीकरण करण्याची जबाबदारी या कंपनीची

बेस्ट व्यवस्थापन लेखी उत्तरानुसार, या १४२ इलेक्ट्रिक सेडान गाड्या नागपूरस्थित सर्गो ओव्हरसीज प्रा. लि.कडून भाड्याने घेतल्या आहेत. करारानुसार, फिटनेस आणि विमा प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी या कंपनीची आहे.

दरवर्षी ५ लाखांहून अधिक भाडे

गाड्या १५ वर्षांसाठी भाड्याने घेण्यात आल्या असून, बेस्ट या कंपनीला प्रत्येक गाडीमागे दरमहा ₹४२,४००, म्हणजेच दरवर्षी ₹५,०८,८०० भाडे देते. पहिल्या १० वर्षांसाठी दरमहा ₹४२,४०० आणि उर्वरित ५ वर्षांसाठी ₹२८,४०७ इतके भाडे ठरवले आहे. आरटीओ नोंदीनुसार, या गाड्या नोव्हेंबर २०२२ ते जून २०२३ या कालावधीत नोंदणीकृत झाल्या आहेत.

दंडाची तरतूद

वैध फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या वाहनास चालवण्यास ₹२,००० ते ₹५,००० दंड ठोठावला जाऊ शकतो. पुनरावृत्ती झाल्यास ₹१०,००० आणि तुरुंगवासही होऊ शकतो, तर विम्याविना वाहन चालवण्यास पहिल्यांदा ₹२,००० आणि नंतर ₹४,००० दंड होऊ शकतो, तसेच कैदही होऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in