
मुंबई : मंगळवारी (दि. १५)फोर्ट परिसरातून जात असलेल्या बेस्टने भाडेत्त्वावर घेतलेल्या इलेक्ट्रिक दुमजली बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या दुर्घटनेत बसचे मोठे नुकसान झाले आहे.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टची बस मार्ग क्रमांक ए-१३८ सकाळी सीएसएमटी बस आगारातून निघाली. बस भाटिया बाग परिसरातून बॅकबे आगराकडे जात होती. सिद्धार्थ महाविद्यालयच्या सिग्नलजवळ सकाळी ९.१५ च्या सुमारास पोहचली. आणि बसला आग लागली. मॅनहोलचे झाकण बसच्या बॅटरीला लागल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बसचे पुढचे चाक या मॅनहोलवर आल्यानंतर मॅनहोलचे झाकण उघडले गेले आणि त्यानंतर हे झाकण बसच्या बॅटरीला लागल्याने बसला आग लागली, असे बेस्टचे महाव्यवस्थापक एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी सांगितले.
आग लागल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. आग लागताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी यावेळी बसमधून उड्या घेतल्या. ही डबल डेकर बस सीएसएमटीकडून मंत्रालयाकडे जात होती.