

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला वीजपुरवठा करण्यासाठी एका बड्या उद्योगपतीशी संबंधित कंपनीने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे (एमईआरसी) अर्ज केल्याने बेस्ट उपक्रमाचे धाबे दणाणले आहेत. बेस्ट ही मुंबई शहरात वीजपुरवठा करत असून या बड्या कंपनीला परवानगी देऊ नये यासाठी ‘एमआरसीए’कडे आक्षेप नोंदवणार आहे. तसेच मुंबईत मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाची कामे सुरू असून याठिकाणी बेस्टला वीजपुरवठा करण्याची मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी सांगितले.
दरम्यान, पूर्व व पश्चिम उपनगरात वीजपुरवठा करण्याबाबत बेस्टने चाचपणी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या माध्यमातून १० लाख ८० हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. मात्र नवीन वीज ग्राहक आकर्षित करण्यासाठी बेस्ट उपक्रमाचा प्लॅन अपुरा पडतोय. त्यामुळे वीजपुरवठा करण्यात स्पर्धक निर्माण झाले आहेत.
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वांत मोठ्या नागरी पुनर्विकास प्रकल्पांपैकी एक मानला जातो. पुनर्विकासानंतर निर्माण होणाऱ्या निवासी व व्यावसायिक संकुलांना वीजपुरवठा करण्यासाठी बड्या कंपनीने आपले वितरण क्षेत्र वाढविण्याचा प्रस्ताव एमईआरसीकडे सादर केला आहे.
सध्या धारावी परिसरात बेस्ट आणि टाटा पॉवर या दोन्ही कंपन्या वीजपुरवठा करतात. बड्या उद्योगपतीशी संबंधित कंपनीचा अर्ज मंजूर झाल्यास या भागातील ग्राहकांना आणखी एक पर्याय उपलब्ध होईल. मात्र त्याचवेळी बेस्टच्या ग्राहकसंख्येवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या बेस्टकडे सुमारे साडेदहा लाख वीज ग्राहक आहेत. अलीकडील विविध योजनांमुळे उपक्रमाच्या ग्राहकसंख्येत सुमारे साडेपाच हजारांची वाढ झाली असली तरी पुनर्विकास प्रकल्पांमधील नव्या ग्राहकांसाठी खासगी वीज कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढत आहे.
सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत सदस्यांनी या विषयावर चिंता व्यक्त केली. शहरातील अनेक पुनर्विकास प्रकल्पांमध्ये बडी कंपनी आणि टाटा पॉवरकडून विविध सुविधा व आकर्षक पर्याय देण्यात येत असल्याने ग्राहक त्यांच्याकडे वळत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे बेस्टनेही आपले वीज वितरण जाळे विस्तारून नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
बैठकीत उपनगरात वीजपुरवठा सुरू करण्याच्या शक्यतांवरही चर्चा झाली. बेस्टच्या मालकीची शहरात २७ आगारे असून त्यांचा वापर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी करता येऊ शकतो. उपनगरात वीज वितरणासाठी आवश्यक सबस्टेशन, वितरण जाळे आणि अन्य सुविधांच्या उभारणीसह आवश्यक परवानग्या मिळविण्याचा प्रस्तावही पुढे आला.
एक महिन्यात विस्ताराचा आराखडा
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील वीजपुरवठ्याबाबत बेस्टचा स्पष्ट विरोध असल्याचे महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी बैठकीत सांगितले. शहर आणि उपनगरांमध्ये बेस्टचे वीज वितरण जाळे विस्तारण्यासाठी एका महिन्यात सविस्तर आराखडा तयार करण्यात येईल. हा आराखडा बेस्ट समितीसमोर सादर केला जाईल. तसेच वीज वितरण आणि पुरवठा वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून घेण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.