
मुंबई : मुंबईकरांची दुसरी लाईफलाइन असलेल्या बेस्ट उपक्रमाची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी ९ मे २०२५ पासून प्रशासनाने भाडेवाढ लागू केली. परिणामी, या भाडेवाढीमुळे महिनाभरात तब्बल ५ लाख प्रवासी संख्या कमी झाली आहे. मात्र, बेस्टचे मासिक उत्पन्न ७४ कोटी रुपयांनी वाढले आहे, अशी माहिती बेस्टच्या एका अधिकाऱ्याने दिली.
बेस्ट प्रशासनाने राज्य सरकारच्या निर्देशानुसार प्रवासी संख्या वाढवण्यासाठी ९ जुलै २०१९ रोजी तिकीटदर कमी केला. त्यामुळे बेस्टची प्रवासी संख्या १७ लाखांवरून ३१ लाखांवर म्हणजेच जवळपास दुप्पट झाली. मात्र, ९ मे रोजीपासून लागू करण्यात आलेल्या तिकीट दरवाढीमुळे दिवसेंदिवस प्रवाशांच्या संख्येत घट होत आहे. बेस्टने दरवाढ केली असली तरी, बेस्ट बसच्या संख्येत वाढ केलेली नाही. यामुळे प्रवाशांना बससाठी तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे, जवळच्या ठिकाणी जाणारे प्रवासी बसऐवजी शेअर रिक्षा किंवा टॅक्सीचा पर्याय निवडत असल्याचे समोर आले आहे.
मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. बेस्टची आर्थिक घडी बसवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तिकीट दरवाढ केल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या संख्येत घट झाली असली तरी बेस्टचे उत्पन्न मात्र वाढले आहे.
बसगाड्यांची संख्या कमी
भाडेवाढ झाली त्या दिवशी बसच्या ताफ्यात एकूण २,७२१ बसगाड्या होत्या, त्यापैकी, अवघ्या ६०२ गाड्या या बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या होत्या. उर्वरित बसगाड्या भाडेतत्त्वावरील होत्या. त्यापैकी, सद्यस्थितीत केवळ २,५९३ बसगाड्या ताफ्यात आहेत. त्यापैकी बेस्टच्या अवघ्या ४३६ बसगाड्या आहेत. म्हणजे गेल्या महिन्याभरात बेस्टच्या ताफ्यातून एकूण १२८ बसेस कमी झाल्या आहेत. तर आतापर्यंत, बेस्टच्या स्वमालकीच्या ताफ्यातील १६६ बस कमी झाल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, प्रवासी संख्येत वाढ होण्यासाठी डिसेंबर २०२५ अखेर पर्यंत बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील २५०० वातानुकूलित बसगाड्या येण्याची बेस्ट प्रशासनाला अपेक्षा आहे. ज्यामुळे उत्पन्न वाढीस मदत होणार असल्याचे बोलले जाते.