

मुंबई : अतिवृष्टी झाली आणि इलेक्ट्रिक मीटर बॉक्समध्ये पावसाचे पाणी शिरले तर तातडीने घरातील मुख्य स्विच बंद करावा, मीटर बॉक्स उंच बांधावा, जेणेकरून पावसाचे पाणी कॅबिनमध्ये शिरणार नाही. यंदाच्या पावसाळ्यात वीज ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी दिवसरात्र कंट्रोल रुम कार्यरत असणार आहे. एकूणच यंदाच्या पावसाळ्यासाठी बेस्ट उपक्रम सज्ज झाला आहे.
ग्राहकांच्या तक्रारीच्या निवारणार्थ बेस्ट उपक्रमातर्फे आठवडयाच्या सर्व दिवशी रात्रंदिवस (२४ तास) एकूण नऊ ‘वितळतार नियंत्रण कक्ष’ (फ्युज कंट्रोल) कार्यरत आहेत. या नियंत्रण कक्षात तक्रार नोंदवताना वीजग्राहकांनी त्यांचा वीजग्राहक क्रमांक अथवा वीजमापक क्रमांक नोंदवावा.
वीजग्राहक त्यांच्या सदनिकांच्या खंडीत विद्युत पुरवठा विषयीच्या तसेच विजेच्या ठिणग्या उडणे, शॉक लागणे, आग लागणे इ. तक्रारी नियंत्रण कक्षात नोंदवू शकतात, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे.