कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत बेस्ट सकारात्मक

महाव्यवस्थापकाबरोबर पार पडलेल्या बैठकीत आश्वासन
कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत बेस्ट सकारात्मक

मुंबई : मोफत प्रवास, रजा, बेसिक पगारात महिना १,२०० रुपये वाढ आदी मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन बेस्ट उपक्रमाने दिल्याचे कंत्राटी कामगारांच्या प्रतिनिधींनी दिली.

बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी २ ऑगस्टपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले होते. आझाद मैदानात ७ दिवस सुरू असलेल्या बेस्टच्या कंत्राटी कामगारांच्या आंदोलन स्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, प्रतिनिधींनी भेट देऊन कामगारांच्या अडचणी समजून घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार कामगारांनी आंदोलन मागे घेतले. गुरुवार २४ ऑगस्ट रोजी बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल, बसचे ठेकेदार व कामगारांचे प्रतिनिधी यांच्या समवेत बेस्ट भवन, मुंबई येथे कामगारांच्या मागण्या आणि प्रश्न या विषयावर बैठक पार पडली. या बैठकीत कामगारांच्या बोनस, रजा, मोफत पास, न्यायालयीन केसेस इत्यादी सर्व मागण्या मंजूर करून त्यांच्या महिना बेसिक पगारात रुपये १२०० ची वाढ करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.

दरम्यान, या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे अध्यक्ष जेरी डेव्हिड, माजी नगरसेवक किरण लांडगे, नागेश टवटे, सुरेश तोडकर, रघुनाथ खजूरकर आदी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत बेस्ट उपक्रमाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने सर्व कामगारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. दरम्यान, या विषयी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांना संपर्क व व्हाट्सअपवर विचारणा केली असता प्रतिसाद दिला नाही.

logo
marathi.freepressjournal.in