बेस्टच्या वीज व वाहतूक विभागात होणार भरती; प्रशासनाचे बेस्ट कामगार सेनेला आश्वासन

मागील कित्येक वर्षं तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमातील वीज विभागात रिक्त असलेल्या जागा लवकरच भरण्यात येणार आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मागील कित्येक वर्षं तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमातील वीज विभागात रिक्त असलेल्या जागा लवकरच भरण्यात येणार आहेत. वीज विभागातील ग्राहकसेवा विभाग आणि वाहतूक विभागातील रिक्त पदे तसेच कर्मचाऱ्यांच्या रोखण्यात आलेल्या बढत्या देण्याबाबत विभाग प्रमुखांकडून सूचना मागवण्यात येणार असल्याचे आश्वासन बेस्ट प्रशासनातर्फे बेस्ट कामगार सेना युनियनच्या शिष्टमंडळाला देण्यात आल्याची माहिती युनियनने दिली.

कुलाबा आगार येथे बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत, सरचिटणीस रंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बेस्ट कामगार सेनेचे शिष्टमंडळ आणि आगारातील कार्यकर्ते यांनी बेस्ट महाव्यवस्थापक यांची भेट घेतली.

उपक्रम तोट्यात असल्याचे कारण दाखवून कर्मचाऱ्यांची पदोन्नती नाकारली जात आहे. हा कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय असून तो सहन केला जाणार नाही, असा इशारा सामंत यांनी दिला.

विभागप्रमुखांना योग्य निर्देश देण्यात देऊन शक्य तिथे प्रमोशन धोरण राबविले जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

विद्युत पुरवठा विभागातील या पदांवर भरती

ग्राहकसेवा विभागातील मीटर वाचक, बिल मेसेंजर इत्यादी पदे भरण्याकरिता एक-दोन दिवसात परिपत्रक काढण्याचे कर्मचारीय विभागाने मान्य केले. येत्या काही दिवसात सदर पदे भरण्यात येणार आहेत.

वाहतूक विभागातील या पदांवर भरती

वाहतूक विभागातील रिक्त पदे उदा. बस प्रवर्तक, लेखानिक, बस निरीक्षक पदाकरिताची पदोन्नती सुरू करण्यात येतील याबाबत संबंधित विभाग प्रमुखांकडून सूचना मागवण्यात येणार आहेत. असे सुशील पवार यांनी सांगितल्याचे युनियनने कळविले आहे.

logo
marathi.freepressjournal.in