मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बस सेवेसाठी बेस्टच्याच वीजपुरवठा विभागाकडून आर्थिक अनुदान मिळत आले आहे. बेस्ट उपक्रमाची संपूर्ण मालकी ही मुंबई महापालिकेकडे असल्याने आता महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पातून बेस्ट बससेवा चालविण्यासाठी थेट अनुदान द्यावे. कंत्राटी तत्त्वावरील बसगाड्या बंद करून संपूर्ण बसताफा हा बेस्टच्या मालकीचा असावा. बंद करण्यात आलेले बसमार्ग पुन्हा सुरू करून बसगाड्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी मंगळवारी आमची मुंबई आमची बेस्ट या प्रवासी संघटनेकडून करण्यात आली.
विशेष म्हणजे या ७ आॅगस्टला बेस्ट प्रशासनाने उपक्रमाचा ७७ वा वर्धापन साजरा केला आणि त्याच दिवशी प्रवासी संघटनांनी बेस्ट बस वाचवा, अशी आर्त हाक दिली. प्रेस क्लबमधील पत्रकार परिषदेत संघटनेचे आमंत्रक विद्याधर दाते यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी बेस्टची बससेवा सरकारकडून कशी डबघाईला आणली जात आहे, याचे विवेचन केले. सामाजिक कार्यकत्या तपती मुखोपाध्याय, राजू परुळेकर यांनी प्रवासीवर्गाचा आवाज बुलंद केला. बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यासाठी प्रशासन टाळाटाळ का करीत आहे, असा सवाल संघटनेतर्फे विचारण्यात आले.
संघटनेतर्फे सांगण्यात आले की, बेस्टचे अधिकारी २०१९ पासून बसगाड्यांची संख्या वाढविण्याचे आश्वासन देत आहेत. प्रत्यक्षात बसची संख्या घटत गेली आहे. २०१० मध्ये बेस्टच्या सुजज्ज ताफ्यात ४३८५ गाड्या होत्या. यंदा जुलैपर्यंत ही संख्या ३१५८ वर घसरली आहे. त्यातीलही केवळ १०७२ गाड्या बेस्टच्या मालकीच्या आहेत. सेवेचे कंत्राटीकरण असेच सुरू राहिले तर, बेस्टच्या मालकीत्या बस भविष्यात शुन्याुवर येतील. सार्वजनिक वाहतूक सुविधा हा नागरिकांचा हक्क आहे. पण, परवडणार्या सुरक्षित वाहतूक सुविधेचे आश्वासन कोणताही राजकीय पक्ष निवडणुकीत का देत नाही, असा प्रश्नही संघटेनेने विचारला आहे.
सरकारच्या धोरणामुळे १९९८ पासून प्रत्येक दशकात खासगी कार-वाहनांची संख्या जवळपास दुप्पट होत गेली आहे. त्यातून वाहतूककोंडी वाढल्याने बेस्टसाठी मुख्य रस्त्यांवर राखीव मार्गिका असावी, असी मागणीही करण्यात आली.
आगारांचे व्यापारीकरण ही मृत्यूघंटा
बेस्टच्या आगारांचा व्यापारीकरणासाठी पुनर्विकास करणे म्हणजे बस सेवेची मृत्यूघंटा ठरणार आहे. असा इशारा संघटनेने दिला. उपक्रमाच्या खासगीकरणाचा हा अखेरचा टप्पा असेल. कंत्राटीकरणामुळे बेस्टचे कर्मचारी, यंत्रणा बिनकामाचे ठरत आहेत. काही आगारांचा पुनर्विकास झाला असून यापुढे सर्वच आगारांचे व्यापारीकरण करण्याची पालिकेची योजना आहे. यातून सार्वजनिक जागा बिल्डरांच्या घशात जाण्याबरोबरच बेस्टला पुन्हा सक्षम करणेही दुरापास्त होईल, असे संघटनेचे म्हणणे आहे.
दोन हजार लोकांमागे एक बस असावी
मुंबईतील परवडणा-या बससेवेचा दर्जा सुधारण्यासाठी दोन हजार लोकसंख्येमागे एक बस या प्रमाणकाचा स्वीकार करावा. सध्या बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील २०८६ बस आहेत. बेस्टच्या आधीच्या बसपेक्षा यातील अनेक बस या लहान आकाराच्या आहेत. त्यातून बेस्टची प्रवासी वहन क्षमता कमी झाल्याचे स्पष्ट होते, असा दावा प्रवासी संघटनेने केला आहे.