

मुंबई : मुंबईकरांना अधिकाधिक बस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आता बेस्ट उपक्रमाने आणखी १ हजार ५०० मिडी इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. १२ वर्षांसाठी या बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.
गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागात बेस्ट बसेसच्या ताफा कमी होत आहे. सध्या मुंबईत २ हजार ७९२ बसगाड्या असून यामध्ये बेस्टच्या स्वमालकीच्या २४९, तर भाडेतत्त्वावरील २,५४३ बस आहेत. यामध्ये बेस्ट उपक्रमाच्या २४९ मालकीच्या असलेल्या बसमध्ये ३७ बस महिलांसाठीच्या तेजस्विनी मिडी बस आहेत. तर भाडेतत्त्वावरील ६२५ मिडी बस आहेत.
आता मिडी बसेसची संख्या वाढवण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. केंद्र सरकारच्या योजनेतून मिडी एसी इलेक्ट्रिकल बस घेतल्या जाणार आहेत. नऊ मीटर लांबीच्या असलेल्या या बस भाडेतत्त्वावर घेण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
निविदेद्वारे दोन कंपन्यांची निवड
केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामार्फत त्याची निविदा काढून दोन कंपन्यांचीही निवड करण्यात आली आहे. १२ वर्षासाठी या बस भाडेतत्त्वावर घेताना त्यासाठी मोठी रक्कम बेस्ट उपक्रम मोजणार आहे. परंतु यासाठी बेस्ट समितीची मंजुरी घेणे बंधनकारक आहे.