बेस्ट सेवा २४ तासांत पूर्ववत करणार -लोढा

मुंबईच्या रस्त्यावरील बेस्ट बसेसची संख्या कमी झाल्याने मुंबईकरांचे हाल सुरू आहेत
बेस्ट सेवा २४ तासांत पूर्ववत करणार -लोढा

मुंबई : बेस्टच्या कंत्राटी कामगारांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था येत्या २४ तासांत पूर्ववत करणार असल्याचे आश्वासन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. सध्या ४०० बसेसचा तुटवडा असून, तो भरून काढण्यासाठी आणि आवश्यक चालक शोधण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कामगारांची किमान वेतनाची मागणी, त्यांचा दिवाळी बोनसचा विषय, त्यांना आवश्यक सोयीसुविधा, या सर्वांची कायदेशीर पूर्तता व्हावी, असे सरकारतर्फे बसेसच्या मालकांना सांगण्यात आल्याचेही ते म्हणाले. मंत्रालयातील त्यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बसचे कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यावरील बेस्ट बसेसची संख्या कमी झाल्याने मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. शनिवार, रविवार असल्याने गेले दोन दिवस फारसे हाल झाले नाहीत. मात्र सोमवारपासून पुन्हा शाळा-कॉलेज आणि कार्यालये सुरू झाल्याने सकाळपासून जनतेचे हाल सुरू झाले. राज्य सरकारने या संपातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कंत्राटी कामगारांच्या मागण्या लक्षात घेऊन त्यासंदर्भात बसेसच्या मालकांशी चर्चा करण्यात आली. कंत्राटी कामगारांच्या मागण्या सोडवण्याबाबत सरकार उदासीन नाही आणि याबाबत पुन्हा एक बैठक घेऊ, असेदेखील लोढा यांनी स्पष्ट केले.

बेस्टच्या ताफ्यात एकूण ३०५२ बसेस आहेत. त्यापैकी १३८१ बसेस ह्या बेस्टच्या मालकीच्या असून, १६७१ बसेस भाडेतत्त्वावर आहेत. बेस्टच्या आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारद्वारे बेस्टच्या ताफ्यात ३०५२ बसेसपैकी २६५१ बसेस नागरिकांच्या सेवेत कार्यरत करण्यात आल्या आहेत. यासाठी एसटी महामंडळाच्या सहयोगाने १८० बसेस, २०० पेक्षा जास्त स्कूल बसेससुद्धा नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सध्या ४०० बसेसचा तुटवडा असून, तो भरून काढण्यासाठी आणि आवश्यक चालक शोधण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in