मुंबई : माऊंट मेरी जत्रेत निमित्ताने यांनी येणाऱ्या भाविकांसाठी बेस्ट उपक्रमाने जादा बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवार १० ते १७ सप्टेंबर दरम्यान माऊंट मेरी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाने २८७ जादा बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
वांद्रे (प) येथील 'माऊंट मेरी यात्रा' रविवार १० सप्टेंबरपासून सुरु होत आहे. माऊंट मेरी जत्रेत देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वांद्रे पूर्व स्थानकांत मोठी गर्दी होत असते. भाविकांसाठी यंदाही बेस्ट उपक्रमाने संपूर्ण आठवडा २८७ अतिरिक्त बसगाडया वांद्रे स्थानक (प) आणि हिल रोड दरम्यान चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
'माऊंट मेरी चर्च' येथे तसेच 'फादर अँग्नल आश्रम' या परिसरामध्ये यात्रेसाठी येणारे भाविक व प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने बस गाड्यांचे प्रवर्तन माऊंट मेरी चर्चपर्यंत करणे शक्य नसते. परिणामी या अतिरिक्त बसगाडया वांद्रे रेल्वे स्थानक (प) आणि हिल रोड उद्यान दरम्यान कार्यान्वित करण्यात येतील. याव्यतिरिक्त वांद्रे परिसरातून प्रवर्तित होणाऱ्या उपक्रमाच्या नियमित बस मार्गांवर देखील अतिरिक्त बस गाडया प्रवर्तित करण्यात येतील. दरम्यान, प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे प्रवाशांना करण्यात येत आहे.
बस निरीक्षक, वाहतूक अधिकारी तैनात
वांद्रे स्थानक (प) आणि माऊंट मेरी चर्च परिसरात होणारी प्रवाशांची गर्दी विचारात घेऊन प्रवाशांना योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती या संपूर्ण कालावधीत करण्यात आलेली आहे.