
भाडेतत्त्वावरील बसेस चालवणाऱ्या कंत्राटी चालक व वाहकांना वेळेवर पगार व पीएफचे पैसे मिळत नसल्याने त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. मंगळवारपासून सुरू केलेले कामबंद आंदोलन शुक्रवारी कायम असून पीएफ व पगाराचे पैसे मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा पवित्रा कंत्राटी चालक व वाहकांनी घेतला आहे.
प्रवाशांचा प्रवास गारेगार व आरामदायी व्हावा, यासाठी बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील बसेस घेतल्या आहेत. जेवढे किलोमीटर बस धावणार, तेवढे पैसे कंत्राटदार कंपनीला देण्याचा करार झाला आहे. तसेच भाडेतत्त्वावरील बसेसवर चालक व वाहक कंत्राटदाराचा आहे. त्यामुळे पगार व पीएफ देण्याबाबत बेस्ट उपक्रमाचा संबंध नाही. कंत्राटी कामगारांना पगार व पीएफचे पैसे देणे ही संबंधित कंपनीची जबाबदारी आहे. मात्र कंत्राटी चालक व वाहकांनी कामबंद आंदोलन केले असून ज्या दिवशी बसेस धावणार नाही, त्या बसेसच्या संख्येनुसार प्रतिबस ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.