गणेश दर्शनासाठी वातानुकूलित हो-हो बस सुरु करण्याचा बेस्टचा निर्णय

सदर बस सेवा ३ ते ८ सप्टेंबर या कालावधीत रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत दर २५ मिनिटांच्या अंतराने प्रवर्तित करण्यात येणार आहे.
गणेश दर्शनासाठी वातानुकूलित हो-हो बस सुरु करण्याचा बेस्टचा निर्णय

गणेशोत्सवादरम्यान गणेशभक्तांना सार्वजनिक गणपतीचे दर्शन सुलभ रीतीने करता यावे, याकरिता बेस्ट उपक्रमाने रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत खुल्या दुमजली बस गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. विशेष म्हणजे, या बसने एका मंडळातील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी प्रवासी थांबला असता दुसऱ्या बसने त्याच तिकिटावर गणेश दर्शनासाठी पुढे जाऊ शकतो.

गणेशभक्तांचा वाढता उत्साह आणि खुल्या दुमजली बस गाड्यांना मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून बेस्ट उपक्रमाने आता वातानुकूलित हो-हो बस सेवा गणेशभक्तांच्या सेवेकरिता दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर बस सेवा ३ ते ८ सप्टेंबर या कालावधीत रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत दर २५ मिनिटांच्या अंतराने प्रवर्तित करण्यात येणार आहे. या बसगाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्रवर्तित होणार असून मेट्रो, गिरगाव चर्च, प्रार्थना समाज, ताडदेव, नागपाडा, भायखळा रेल्वे स्थानक पूर्व, जिजामाता उद्यान, लालबाग, हिंदमाता, दादर रेल्वे स्थानक पूर्व, दादर टीटी या ठिकाणाहून वडाळा बस आगारापर्यंत चालवल्या जाणार आहेत.

६० रुपयांत पास उपलब्ध

या बसेससाठी केवळ ६० रुपये इतक्या दराचा बसपास उपलब्ध असून यामध्ये साधी, मर्यादित तसेच वातानुकूलित बसगाडीतून प्रवासाकरिता सदर पास वैध राहणार आहे; परंतु खुल्या दुमजली बस गाडीसाठी वैध नसेल. ही बससेवा गणेशभक्तांना एका ठिकाणी उतरून गणेश दर्शनानंतर पुन्हा पुढील ठिकाणी गणेश दर्शनासाठी जाण्याकरिता उपलब्ध असणार आहे. अधिक माहितीकरिता प्रवाशांनी कृपया १८००२२७५५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in