दंश करणाऱ्या माशांपासून सावधान राहा; विसर्जन सोहळ्याबाबत महापालिकेचे नागरिकांना आवाहन

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर दंश करणाऱ्या मासे तसेच समुद्री जीवांचे अस्तित्व राज्याच्या मत्स्य विकास विभागाच्या पाहणीत दिसून आले आहे. त्यामुळे श्री गणेश मूर्तींचे समुद्रात विसर्जन करताना नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
दंश करणाऱ्या माशांपासून सावधान राहा; विसर्जन सोहळ्याबाबत महापालिकेचे नागरिकांना आवाहन
Published on

मुंबई : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर दंश करणाऱ्या मासे तसेच समुद्री जीवांचे अस्तित्व राज्याच्या मत्स्य विकास विभागाच्या पाहणीत दिसून आले आहे. त्यामुळे श्री गणेश मूर्तींचे समुद्रात विसर्जन करताना नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गणेश विसर्जनादरम्यान मुंबईतील समुद्रात मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते.

गणेश विसर्जनादरम्यान गणेश भक्तांना दंश करू शकणारे अपायकारक मासे हे मत्स्य विभागाने केलेल्या 'ट्रायल नेटिंग' मध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (महाराष्ट्र शासन) यांच्याकडून देण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाने गिरगाव आणि दादर चौपाटी येथे गणेश भक्तांना मत्स्यदंश करणाऱ्या माशांचे अस्तित्व आहे काय यासाठीची चाचपणी (ट्रायल नेटिंग) नुकतीच केली. यादरम्यान ढोमी, कोळंबी, स्टिंग रे (पाकट), जेली फीश, शिंगटी, ब्लू जेली फीश, घोडा मासा, छोटे रावस आदी मासे आढळून आहेत. नेटींग दरम्यान पाकट (स्टिंग रे) हे मासे आढळून आले आहेत. त्यासोबतच माशांसोबतच जेली फीश, ब्लू जेली फीश हे अपायकारक मासे आढळून आले आहेत.

या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाद्वारे श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

विसर्जनादरम्यान घ्यावयाची काळजी

१. श्रीगणेश मूर्ती विसर्जन हे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेमणूक केलेल्या जीवरक्षक व संबंधित यंत्रणेमार्फत करावे.

२. श्रीगणेश मूर्ती विसर्जनादरम्यान गणेशभक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करणे टाळावे.

३. गणेश विसर्जनादरम्यान पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा.

४. बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस दल यांच्याद्वारे विसर्जन ठिकाणी वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

५. श्रीगणेश मूर्ती विसर्जन ठिकाणी आवश्यक तेथे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे प्रथमोपचार करण्यासाठी वैद्यकीय कक्ष असणार आहेत. मत्स्यदंशाची घटना घडल्यास संबंधितांनी तात्काळ प्रथमोपचारासाठी या वैद्यकीय कक्षाशी संपर्क साधावा.

पालिका आयुक्तांकडून गिरगाव चौपाटीची पाहणी

मुंबई : मुंबईतील गिरगाव चौपाटी हे श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जन सोहळ्याचे एक प्रमुख ठिकाण असल्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला.

गणेशोत्सव अंतर्गत स्वराज्य भूमी (गिरगांव चौपाटी) येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागामार्फत भाविकांसाठी विविध नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी स्वराज्यभूमीला भेट देवून संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली व योग्य ते निर्देश दिले. सहायक आयुक्त शरद उघडे, संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in