मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन भाई जगताप यांची उचलबांगडी; त्या जागी 'या' नव्या नेत्याची नियुक्ती

काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी याबातची घोषणा केली आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन भाई जगताप यांची उचलबांगडी; त्या जागी 'या' नव्या नेत्याची नियुक्ती

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ऐन निवडणूकीच्या तोंडावर मोठे बदल केले आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची त्यांच्या पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी याबातची घोषणा केली आहे. भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन अचानक उचलबांगडी करण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस हायकमांडने हे बदल फक्त मुंबईत केले नसून गुजरात आणि पुदुच्चेरीच्या प्रदेशाध्यक्षांची देखील उचलबांगडी झाली असून त्या जागी नव्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे.

भाई जगताप हे गेल्यावर्षी जून महिन्यात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडुन निवडणुकीत उतरले होते. काँग्रेसने या निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे यांना पहिल्या पसंतीची तर भाई जगताप यांना दुसऱ्या पसंतीची मतं द्यायला सांगितलं होतं. तही देखील भाई जगताप यांनी ही निवडणूक जिंकली होती. यानंतर काँग्रेसमध्ये क्रॉस बोटींग झालं का? याबाबत देखील चर्चा रंगल्या होत्या. काँग्रेसकडून याची समितीमार्फत चौकशी केली गेली होती. मात्र, चौकशीनंतर देखील कोणत्याही नेत्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नव्हती.

मध्यंतरी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात देखील काँग्रेसमधून नाराजीचा सूर उमटला होता. राज्यातील काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. काही नेते तर नाना पटोले यांच्या तक्रारी घेऊन दिल्ली हायकमांडला भेटल्याचं देखील सांगण्यात येत होते. आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडावेळी देखील बाळासाहेब थोरात यांनी पटोलेच्या विरोधात नाराजी व्यक्त केल्याचं बोललं गेलं होतं. त्यावेळी नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी होणार का? याबाबत चर्चा रंगल्या होत्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in