मनपामध्ये नोकरीच्या आमिषाने गंडा घालणार्‍या भामट्यांना अटक

नोकरीसह गिरणी कामगाराच्या फ्लॅटसाठी २९ लाख घेऊन या पैशांचा अपहार केला
मनपामध्ये नोकरीच्या आमिषाने गंडा घालणार्‍या भामट्यांना अटक

मुंबई : मनपामध्ये नोकरीच्या आमिषाने गंडा घालणार्‍या दोन भामट्यांना बोरिवली पोलिसांनी अटक केली. भरत कानजी सोलंकी आणि गिरीधर छगन लाड अशी या दोघांची नावे असून या दोघांनी नोकरीसह गिरणी कामगारासाठी असलेली सदनिका देण्याचे आमिष दाखवून एका महिलेसह दोघांची सुमारे २९ लाखांची फसवणुक केल्याचे पोलिसांनी सांगितले. ४८ वर्षांचे तक्रारदार त्यांची पत्नी आणि दोन मुलांसोबत बोरिवली परिसरात राहत असून ते चारकोप येथील एका मेडीकल शॉपमध्ये काम करतात. गिरीधर हा त्यांच्या परिचित असून त्याने त्यांचा मुलगा देवेंद्र आणि भरत सोलंकी हे दोघेही गरजू व बेरोजगार तरुणांना महानगरपालिकेत नोकरी मिळवून देतात. त्याने त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न करतो असे सांगून भरतला त्यांची माहिती सांगितली होती. यावेळी भरतने नोकरीसाठी त्यांच्याकडे आठ लाखांची मागणी केली होती. महानगरपालिकेत नोकरी मिळत असल्याने त्यांनी त्यास होकार देत त्यांना टप्याटप्याने आठ लाख रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत भरतने त्यांना नोकरी दिली नाही. तसेच भरतने त्यांच्या पत्नीच्या चुलत काकीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्याकडून आठ लाख रुपये घेतले होते. तसेच गिरणी कामगार असलेले आजोबांचे नाव गिरणी कामगाराच्या यादीत टाकून त्यांना गिरणी कामगारासाठी मिळणारे फ्लॅट देतो असे सांगून तेरा लाख रुपये घेतले होते. त्याने त्यांच्यासह पत्नीच्या काकीला नोकरीचे बोगस नियुक्तीपत्रासह इतर दस्तावेज देऊन त्यांची फसवणुक केली. नोकरीसह गिरणी कामगाराच्या फ्लॅटसाठी २९ लाख घेऊन या पैशांचा अपहार केला होता. चौकशीदरम्यान भरतने अशाच प्रकारे अनेकांना महानगरपालिकेत नोकरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणुक केली होती. त्याच्याविरुद्ध जे. जे मार्ग पोलीस ठाण्यात अशाच एका गुन्ह्यांची नोंद असून त्याला याच गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर भरतसह गिरीधर लाड यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच भरतचा कोर्टात्ून तर गिरीधरला बोरिवलीतून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in