

मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावर भांडुप पंपिंग स्टेशनजवळ गुरुवारी सकाळी बेस्ट बस व टेम्पो यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात बेस्टमधील दोन, तर टेम्पोतील पाच जण जखमी झाले. ही बेस्ट बस ठाण्याहून मजास आगाराकडे जात असताना भांडुप पंपिंग स्टेशनजवळ हा अपघात झाला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मातेश्वरी कंपनीची भाडेतत्त्वावरील ही बस असून मजास आगाराच्या ४९२ मर्यादित क्रमांकावर ती धावत होती. ही बस भूमी एकर्स ठाणे ते मजास आगार अशी जात असताना गुरुवारी सकाळी ६.४५ वाजता भांडुप पंपिंग स्टेशनजवळ विरुद्ध बाजूने एक टेम्पो भांडुपहून वाशीला जात होता. सिग्नल क्रॉसिंगला ही दोन्ही वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात बसमधील दोन प्रवासी जखमी झाले, तर टेम्पोमधील पाच प्रवासी जखमी झाले. बसमधील एक प्रवासी व टेम्पोमधील एका प्रवाशास मुलुंड पूर्वेकडील वीर सावरकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच बसमधील एक आणि टेम्पोमधील चार जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
या अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. बेस्टकडून अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. टेम्पोचालक रमेश गुप्ता यांच्या जबानीवरून बसचालक संतोष पाटील यांच्याविरुद्ध या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसमधील जखमी प्रवाशांची नावे
१) सागर राजाराम जाधव (३०)
२) आनंदकुमार साईराम शर्मा (६४)
टेम्पोमधील जखमी प्रवाशांची नावे
१) दुर्गादास नागेश देवकर (५४)
२) राजेश कुमार मिठाईलाल जयस्वाल (५४)
३) गुलाब चिनीलाल जयस्वाल (७२)
४) संजय श्यामलाल जयस्वाल (३७)
५) रमेश बेचेनलाल गुप्ता (टेम्पोचालक, ३४)