
मुंबई : दहीहंडी उत्सवाची परवानगी मिळावी म्हणून हायकोर्टात धाव घेणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला दणका बसला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव पालिकेने दहीहंडी उत्सवाची परवानगी नाकारल्यानंतर त्यात हस्तक्षेप करण्यास न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने नकार देत शिंदे गटाची भांडुपमध्ये दहीहंडी उत्सव आयोजित करण्याची मागणी फेटाळून लावली.
भांडुप पश्चिम येथील गाढव नाका, लाला शेठ कंपाऊंड जवळील अशोक केदारे चौक येथे शिंदे गटाच्या संदीप जळगावकर यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भांडुप पोलीस, आरटीओ तसेच अग्निशमन विभागाने या उत्सवाला ना हरकत प्रमाणपत्र दिले असताना पालिकेने मात्र उत्सवाला परवानगी अद्याप न दिल्याने जळगावकर यांनी अॅड. प्रतीक सबराड व अॅड. अमेय सावंत यांच्या मार्फत याचिका दाखल केली.