

मुंबई : भांडुप संकुलात उभारण्यात येत असलेला २,००० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई महानगराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेची कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि लवचिकता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. या प्रकल्पाद्वारे मुंबईकरांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांनुसार अधिक गुणवत्तापूर्ण, सुरक्षित आणि शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
मुंबईतील वाढती लोकसंख्या, नागरीकरणाचा वेग, औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रातील वाढ तसेच भविष्यातील पाण्याच्या वाढत्या मागणीचा विचार करता, महानगराच्या दीर्घकालीन जलसुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. या जलशुद्धीकरण प्रकल्पाशी संबंधित सर्व नागरी, स्थापत्य, विद्युत, यांत्रिक व प्रक्रिया अभियांत्रिकी कामांना गती देऊन निर्धारित कालावधीपूर्वी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.
दोन वर्षे लागणार
भांडुप संकुल येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत २,००० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. जुलै २०२८ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पालिका आयुक्तांनी या प्रकल्पाची आज पाहणी केली.
भांडुप संकुलातील ७.४ हेक्टर जागेवरील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या विद्यमान प्रकल्पाला पुनर्स्थित करेल. ज्यामुळे मुंबईला अधिक शुद्ध पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. पाण्याची वाढती गरज भागवणे आणि आयुर्मान संपलेल्या जुन्या प्रकल्पाची जागा घेणे, हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
सद्यस्थितीत माती परीक्षण, खोदकाम, प्रकल्पस्थळास बॅरेकेडीग, वीजवाहक तारांच्या मनोऱ्यांचे स्थलांतरण, वृक्षारोपण आदी कामांना वेग मिळाला आहे. स्थापत्य कामांसह यांत्रिकी, विद्युत व उपकरणीयकरणाची कामे समांतरपणे सुरू करण्यात आली आहेत.
पाणीपुरवठा क्षमता वाढणार
भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे बांधकाम ४३ वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. हा प्रकल्प कमकुवत झाल्याने २,००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. नवीन प्रकल्पात दररोज २, ००० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप संकुलाची क्षमता वाढवण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.
मलजल प्रक्रिया केंद्र ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित
भांडुप येथील २१५ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पाची कामे अंतिम टप्प्यात आहे. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी या कामाची पाहणी केली. ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित करावा, असे निर्देश त्यांनी दिले.