
मुंबई : मुंबईला भांडुप संकुलातून तब्बल ९०० दशलक्ष लिटर पाण्याचे शुद्धीकरण करून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये असलेल्या पंपाची देखभाल खासगी कंपनीमार्फत केली जाते. पंपिंग स्टेशनमध्ये महापालिकेचे कर्मचारी भरती करण्यात न आल्याने खासगी कंपनीकडून सेवा घेतली जात असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या केंद्राची देखभाल करणाऱ्या खासगी कंपनीसोबतचा कंत्राट संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता नवीन कंपनीची निवड करणार असून पुढील ३ वर्षांसाठी कंपनीसोबत करार करणार आहे.
...म्हणून खासगी संस्थेची सेवा
कर्मचारी भरती करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळालेली होती. आजमितीसही पद सातत्य मिळवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. परंतु ही पदे भरेपर्यंत कामाची निकड आणि आवश्यकता लक्षात घेऊन ९०० दशलक्ष लिटर्स प्रतिदिन क्षमतेच्या पंपिंग स्टेशनच्या देखभालीसाठी खासगी संस्थेची सेवा घेतली जात आहे. तसेच, मुंबईला प्रक्रिया केलेल्या पाण्याचा अविरत पुरवठा सुरू ठेवण्यासाठी या कामाची नितांत गरज आहे आणि त्याकरता खासगी संस्थेची मदत घेतली जात आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.