मुंबई : सीप्झ एसईझेडमधील भारतरत्नम मेगा सीएफसी केंद्रामुळे दर्जेदार दागिन्यांचे उत्पादन शक्य होणार आहे. त्यातून हिरे व ज्वेलरी निर्यातीला चालना मिळणार आहे, असे या क्षेत्रातील उद्योजकांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘भारतरत्नम मेगा सीएफसी केंद्रा’चे उद्घाटन करण्यात आले. उद्योगाच्या अंगभूत कौशल्यांना चालना देण्यासाठी जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. केंद्र सरकारच्या सहाय्यामुळे भारतरत्नम मेगा सीएफसी केंद्र उभे राहिले आहे. या केंद्रामुळे भविष्यातील या उद्योगाच्या वाढीची मुहूर्तमेढ रोवली आहे.
जेम ॲॅण्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सीलचे अध्यक्ष विपुल शहा म्हणाले की, या सीएफसी केंद्राद्वारे निर्यातीचे लक्ष्य ७ अब्ज डॉलर्सवरून १५ अब्ज डॉलर्स करण्याचे ठेवले आहे. या केंद्राची संकल्पना कौन्सीलने तयार केली. या प्रकल्पाचा अहवाल व्यापार खात्याने तयार केला आणि निधी पुरवठा ‘सीप्झ’मार्फत करण्यात आला. या प्रकल्पाची अंमलबजावणी जीजेईपीसी व सीप्झ प्राधिकरणाने केली. या प्रकल्पामुळे सरकारने जड जवाहिरे व दागिने उद्योगांचे रुप पालटले आहे, असे शहा म्हणाले. सीप्झ-सेझचे विभागीय विकास आयुक्त राजेश कुमार मिश्रा म्हणाले की, आवश्यक नुतनीकरण व सुधारणा केल्याने दागिन्यांच्या निर्यातीला चालना मिळणार आहे.
कारागीरांचे सबलीकरण करणार
या केंद्रातून दागिने उत्पादनातील संबंधित प्रत्येक कारागिराचे सबलीकरण केले जाणार आहे. त्यात आवश्यक कौशल्ये, जागतिक ग्राहकांशी थेट संवाद, सेमीनार्सच्या सहाय्याने सतत शिकण्याची प्रक्रिया केली जाणार आहे, असे भारत रत्नम, मेगा सीएफसी वर्किंग ग्रुपचे प्रमुख कॉलीन शहा यांनी सांगितले.