

भाईंंदर : न्यायालयाचा स्थगिती आदेश लागू असतानाही भाईंदरमधील मौजे नवघर येथील वादग्रस्त जमिनीवर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित कंपनीला महापालिकेने बांधकाम परवानग्या दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी विधी अधिकारी, संबंधित विकासक, वास्तुविशारद आणि कनिष्ठ अभियंता अशा चौघांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
संबंधित जमिनीबाबत न्यायालयाने २०२४ मध्ये स्थगिती आदेश दिला होता. मात्र, हा आदेश अस्तित्वात असतानाच महापालिकेच्या नगररचना विभागाने विकासकाला बांधकाम परवानगीसाठी एलओआय आणि सीसी दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी दोन महिन्यांपूर्वी आयुक्तांना चौकशीचे निर्देश दिले होते. तसेच शासनाच्या वकिलांकडून कायदेशीर अभिप्राय घेण्यास सांगितले होते.
सोमवारी सरनाईक यांनी महापालिकेच्या नगररचना विभागात बैठक घेऊन प्रकरणाचा आढावा घेतला. संबंधित ‘सेव्हन इलेव्हन’ ही विकासक कंपनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच जमिनीची नोंदणी मेहता यांच्या मुलाच्या नावावर असल्याची माहितीही त्यांनी बैठकीत दिली.
महापालिकेच्या विधी विभागाच्या अभिप्रायाच्या आधारे नगररचना विभागाने बांधकाम परवानग्या दिल्याचे समोर आले आहे.
मात्र, न्यायालयाचा स्थगिती आदेश लागू असताना अशा परवानग्या देणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचे वरिष्ठ विधिज्ञ ॲड. रामचंद्र आपटे यांनी अभिप्रायात नमूद केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे परवानग्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
परवानग्यांबाबत अंतिम निर्णय सुनावणीनंतर
आयुक्तांनी संबंधित चौघांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. सुनावणीनंतर बांधकाम परवानग्यांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी स्पष्ट केले. महापालिका आयुक्त आणि नगररचना विभागाची दिशाभूल करून परवानग्या मिळवण्यात आल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही परवानग्या कोणत्या आधारावर देण्यात आल्या आणि या प्रकरणात कोणाची जबाबदारी निश्चित होते, याकडे आता भाईंदरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.