भरधाव डंपरखाली चिरडून पती-पत्नीचा मृत्यू

भाईंदर पश्चिम येथील उत्तन-भाईंदर रस्त्यावर मॅक्सेस मॉलजवळ एका भरधाव डंपरने दुचाकीला चिरडल्याने पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भाईंदर पोलिसांनी डंपरचालकाला ताब्यात घेतले आहे.
भरधाव डंपरखाली चिरडून पती-पत्नीचा मृत्यू
Published on

भाईंंदर : भाईंदर पश्चिम येथील उत्तन-भाईंदर रस्त्यावर मॅक्सेस मॉलजवळ एका भरधाव डंपरने दुचाकीला चिरडल्याने पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भाईंदर पोलिसांनी डंपरचालकाला ताब्यात घेतले आहे.

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन परिसरात राहणारे दिनेश माली (५५) आणि त्यांची पत्नी मंजू माली (५०) यांचे भांड्याचे छोटे दुकान होते. बुधवारी ते आपल्या दुचाकीवरून उत्तनहून भाईंदरच्या दिशेने येत होते. तोदीवाडी येथे पोहोचले असता, मागून भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात डंपरचा धक्का लागल्याने त्यांची दुचाकी थेट डंपरच्या पुढच्या चाकाखाली आली. या भीषण अपघातात दिनेश माली यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नी मंजू माली यांना उपचारासाठी भाईंदर पश्चिमेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

या अपघातानंतर भाईंदर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन डंपरचालक जफार देशमुख (५२) याला ताब्यात घेतले आणि डंपर जप्त केला. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in