Bhayandar : आहारबंदीप्रकरणी तपोवन शाळेला अल्पसंख्याक आयोगाची नोटीस; शिक्षण विभागाचीही कारणे दाखवा नोटीस

शाळेच्या डब्यात मेथीची भाजी आणल्याने भाईंदर पूर्व येथील तपोवन विद्यालयातील एका विद्यार्थ्याला ती भाजी खाऊ दिली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याऐवजी शाळेच्या कॅन्टीनमधून खाद्यपदार्थ देऊन त्याचे २० रुपये शुल्क आकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Bhayandar : आहारबंदीप्रकरणी तपोवन शाळेला अल्पसंख्याक आयोगाची नोटीस; शिक्षण विभागाचीही कारणे दाखवा नोटीस
Bhayandar : आहारबंदीप्रकरणी तपोवन शाळेला अल्पसंख्याक आयोगाची नोटीस; शिक्षण विभागाचीही कारणे दाखवा नोटीस'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

भाईंंदर : शाळेच्या डब्यात मेथीची भाजी आणल्याने भाईंदर पूर्व येथील तपोवन विद्यालयातील एका विद्यार्थ्याला ती भाजी खाऊ दिली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याऐवजी शाळेच्या कॅन्टीनमधून खाद्यपदार्थ देऊन त्याचे २० रुपये शुल्क आकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या घरून आणल्या जाणाऱ्या डब्यातील बटाटा, बीट, कांदा, लसूण, मुळा तसेच मांसाहारी पदार्थांवरही निर्बंध घातले जात असल्याच्या तक्रारीनंतर राज्य अल्पसंख्याक आयोगाने शाळेकडून खुलासा मागवला आहे. दरम्यान, नवघर पोलिसांनी शाळेचा जबाब नोंदवला असून शिक्षण विभागानेही शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

यापूर्वी मीरारोड येथील सेव्हन स्क्वेअर शाळेत पर्युषण काळात विद्यार्थ्यांना डब्यात बीट, बटाटा, कांदा, लसूण आदी पदार्थ आणण्यास बंदी घालण्यात आल्याच्या प्रकरणावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर शाळेने संबंधित परिपत्रक मागे घेतले होते. आता तपोवन विद्यालयातील आहारबंदीचा प्रकार समोर आल्याने पुन्हा एकदा शाळांमधील विद्यार्थ्यांच्या खाद्यपदार्थांवरील निर्बंधांचा मुद्दा चर्चेत आला आहे.

तपोवन विद्यालयाबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांनी शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली. विद्यार्थ्यांच्या घरून आणल्या जाणाऱ्या आहारावर अशा प्रकारचे निर्बंध लावता येतात का? याबाबत शाळेकडून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. विद्यार्थ्यांवर अशा प्रकारचे नियम लावता येत नसल्याचे नमूद करत, याप्रकरणी शाळेवर कारवाई का करण्यात येऊ नये? असा सवाल नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

तक्रारदारांची भूमिका

तक्रारदार रॉबर्ट डिसोझा आणि अन्य नागरिकांनी शाळेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विद्यार्थ्याने पर्युषण काळात नव्हे, तर त्यापूर्वी डब्यात मेथीची भाजी आणली होती. त्यामुळे धार्मिक कारणांवरून हा निर्बंध लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शाळा जैन अल्पसंख्याक असली, तरी विद्यार्थ्यांनी घरून आणलेल्या डब्यातील खाद्यपदार्थावर मनाई करण्याचा अधिकार शाळेला नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी नोंदवला शाळेचा जबाब

तपोवन विद्यालयासंदर्भात राज्य अल्पसंख्याक आयोगानेही नोटीस बजावली आहे. या प्रकरणी नवघर पोलिसांनी शाळेचा जबाब नोंदवून तो पोलीस उपायुक्त कार्यालयाकडे पाठवला आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद यादव यांनी दिली.तपोवन विद्यालयात ८० टक्क्यांहून अधिक जैन विद्यार्थी असून ही मान्यताप्राप्त जैन अल्पसंख्याक शाळा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शाळेचा खुलासा

तपोवन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका क्लोथिल्डा बॅप्टिस्टा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे शाळेची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला दंड करण्यात आलेला नसून, शाळेच्या कॅन्टीनमधून पुरवण्यात आलेल्या खाद्यपदार्थाचे शुल्क घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. अल्पसंख्याक आयोग आणि शिक्षण विभागाकडून प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शनाचे पालन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in