Bhayandar : उत्तनमध्ये डिझेलच्या भडक्यात तरुणाचा होरपळून मृत्यू

घरातील स्वयंपाकाचा गॅस संपल्याने मटण शिजवण्यासाठी चूल पेटवताना डिझेलचा वापर करणे ३२ वर्षीय तरुणाच्या जिवावर बेतले.
Bhayandar : उत्तनमध्ये डिझेलच्या भडक्यात तरुणाचा होरपळून मृत्यू
Bhayandar : उत्तनमध्ये डिझेलच्या भडक्यात तरुणाचा होरपळून मृत्यूप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

भाईंंदर : घरातील स्वयंपाकाचा गॅस संपल्याने मटण शिजवण्यासाठी चूल पेटवताना डिझेलचा वापर करणे ३२ वर्षीय तरुणाच्या जिवावर बेतले. उत्तन येथील केशवसृष्टी खाडी परिसरात ही दुर्घटना घडली. डिझेलमुळे चुलीचा अचानक भडका उडाल्याने गंभीररीत्या भाजलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिजु तौलन चौधरी (३२) असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तिजु दूध काढण्याचे काम आटोपून मटन घेऊन घरी परतला. मात्र, घरी गॅस संपल्याने त्याने चूल पेटवण्यासाठी शेजारी राहणाऱ्या कॅरल सेबस्टियन मेन्डोसा यांच्याकडून डिझेल घेतले. त्यानंतर चूल पेटवताना अचानक भडका उडाला.

काही वेळाने घरातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी घरात पाहिले असता तिजु जमिनीवर निपचित पडलेला दिसला. घटनेची माहिती मिळताच उत्तन सागरी पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणल्यानंतर तिजु याला भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, २९ ऑक्टोबर रोजी पहाटे २.२५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)