

भाईदर : देवगड किनाऱ्याजवळ खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या उत्तन येथील मच्छिमारांवर स्थानिक मच्छिमारांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी लाकडी दांडक्यांनी खलाशांना मारहाण करून बोटीच्या केबिनची तोडफोड केली. तसेच बोटीतील मासळी आणि मासेमारीची जाळी लुटून नेल्याचा आरोप पीडित मच्छिमारांनी केला आहे. या घटनेमुळे उत्तनमधील मच्छिमारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
उत्तन येथील डिक्सन तुळजी हे आपल्या 'सोनी' नावाच्या बोटीतून खलाशांसह देवगड किनाऱ्याजवळ मासेमारीसाठी गेले होते. त्यांच्यासोबत उत्तनच्या अन्य तीन बोटीही त्याच परिसरात होत्या.
रात्रीच्या सुमारास स्थानिक मच्छिमारांच्या दोन बोटी तेथे आल्या. 'आमच्या हद्दीत मासेमारी का करता?' असा जाब विचारत त्यांनी वाद घातला. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी लाकडी दांडक्यांनी खलाशांना मारहाण करण्यात आली, तर एका बोटीच्या केबिनच्या काचांचीही तोडफोड करण्यात आली.