भाईंंदर : भाईंदर पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ६ मधून निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका मेबल नोएल कोरिया यांचे नगरसेवकपद जातप्रमाणपत्राच्या वैधतेवरून अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना शिंदे गटाच्या सरिता शिंदे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने कोरिया यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, पुढील सुनावणी १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
प्रभाग ६ मधून मेबल कोरिया या महिला ओबीसी आरक्षित जागेवर निवडून आल्या आहेत. त्यांनी जातप्रमाणपत्र सादर केले असले तरी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी त्यांना १५ जानेवारी २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
सरिता शिंदे यांच्या तक्रारीनुसार, कोरिया यांच्या माहेरचे नाव मेबल लुईस फरेरा असून, त्यांचा जन्म १९७१ मध्ये मनोरी येथे झाला आहे. त्यांच्या शैक्षणिक दाखल्यांमधील नोंदी तसेच वडिलांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत.
तसेच, कुटुंबाचे मूळ वास्तव्य मनोरी येथे असताना धारावी येथील पत्त्याच्या आधारे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून ओबीसी जातप्रमाणपत्र मिळविण्यात आल्याचा आक्षेपही तक्रारीत नोंदविण्यात आला आहे. २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रमाणपत्र जारी झाल्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.समितीने १ जुलै २०२६ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
पत्नीच्या आत्याच्या १९४५ आणि १९५५ सालच्या जमीन फेरफार नोंदींचे पुरावे उपलब्ध असून, तक्रारीतील मुद्द्यांना उत्तर दिले आहे. आवश्यक कागदपत्रे समितीसमोर सादर करू. विरोधकांकडून विनाकारण वातावरण निर्माण केले जात आहे.
नोएल कोरिया, मेबल कोरिया यांचे पती