भुजबळांचा पुन्हा जरांगेंवर निशाणा मतांचे गणित मांडून नव्या वादाला तोंड, मराठा नेत्यांनाही लक्ष्य

भुजबळ यांच्या उपस्थितीत शनिवारी ओबीसी एल्गार सभा झाली. यावेळी त्यांनी ओबीसी समाजाला सरकारी नोकऱ्या ९ टक्के मिळाल्या
भुजबळांचा पुन्हा जरांगेंवर निशाणा मतांचे गणित मांडून नव्या वादाला तोंड, मराठा नेत्यांनाही लक्ष्य

मुंबई : राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचा शनिवारी इंदापूर (जि. पुणे) येथे ओबीसी एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी पुन्हा ओबीसी-मराठा वादाला फोडणी देत मतांचे गणित मांडले आणि मराठा समाजाकडे २० टक्के, तर आमच्याकडे ८० टक्के मते आहेत, असे सांगतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य केले. यावेळी त्यांनी विजयसिंह मोहिते-पाटील, हर्षवर्धन पाटील यांची नावे घेत तुम्हालाही कुणबी आरक्षण पाहिजे का, असा सवाल उपस्थित केला. कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नका, आमची दुसरी कोणतीही मागणी नाही, असेही ते म्हणाले.

भुजबळ यांच्या उपस्थितीत शनिवारी ओबीसी एल्गार सभा झाली. यावेळी त्यांनी ओबीसी समाजाला सरकारी नोकऱ्या ९ टक्के मिळाल्या. आता आधी २७ टक्के जागा भरा आणि मग इतर गोष्टी करा. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात रान पेटवले असताना विचार करणारा मराठा समाज गप्प का, मराठा समाजाच्या मतांसाठी आपण गप्प आहात का, मग आमची मते नाहीत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आरक्षणाच्या मुद्यावर अनेक नेते बोलायला तयार नाहीत. यांना नेमकी कसली भीती वाटते, असा सवाल उपस्थित केला. विजयसिंह मोहिते-पाटील, हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना कुणबी प्रमाणपत्रे पाहिजेत का, ते सांगावे. मुळातच तळागाळातील लोकांना वर आणले पाहिजे. पण तसे होत नाही. आमचे लोक गरीब राहिले. कारण त्यांना काही कळालेच नाही. आम्हाला २७ टक्के आरक्षण आहे. यात अनेक जाती आहेत. त्यात सरकारमध्ये तर आम्हाला फक्त ९ टक्के आरक्षण आहे. ते आता २७ टक्के भरा. मग बाकीचे काहीही करा, असेही भुजबळ म्हणाले.

मी काय बोललो तर लगेचच दोन जातीत भांडणाचा विषय पुढे येतो. जरांगे यांची सभा रात्री उशिरापर्यंत चालते, पण पोलीस कारवाई होत नाही. कायदा फक्त आम्हालाच आहे का, राज्यात अशांतता कोण निर्माण करते, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल उपस्थित करीत जरांगे-पाटील यांच्यावर थेट हल्लाबोल केला. तू जन्मण्याअगोदर मी मुंबईचा महापौर, आमदार झालो होतो. तू फक्त अंतरवाली सराटीचा सरपंच होऊन दाखव, असे आव्हान देत त्यांनी जरांगे यांना तू अकलेने दिव्यांग झाला आहेस, असे म्हटले. त्यामुळे पुन्हा दोघांमध्ये शाब्दिक चकमकी झडण्याची शक्यता आहे.

मंगलप्रभात लोढांना जरांगेंचे उत्तर

एकीकडे भुजबळ मैदानात उतरलेले असताना जरांगे-पाटील यांचाही राज्यात सभांचा धडाका सुरू आहे. शनिवारी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे त्यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कड घेणारे राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर निशाणा साधला. लोढा यांनी अंतरवाली सराटी येथील घटनेत फडणवीस यांचा हात नव्हता. त्यांच्यावर टीका झाली, तरी ते शांत राहिले. तुम्ही शांत राहिले तरी तरुणशक्ती शांत बसणार नाही, असे म्हटले होते. त्यावर बोलताना जरांगे यांनी आमचा अंत पाहू नका, २४ डिसेंबरनंतर राज्यातील तरुण कोणासोबत आहेत ते कळेल, असा इशारा दिला.

logo
marathi.freepressjournal.in