
दिल्लीतील सर्वात उत्तम निवासस्थान हे महाराष्ट्र सदन आहे. दिल्लीच्या सौंदर्यात भर घालणारे हे महाराष्ट्र सदनाचे काम छगन भुजबळ यांनी केले. असेच काम त्यांनी महाराष्ट्र, मुंबई तसेच नाशिक जिल्ह्यात उभा केले. कुठल्याही कामाचा निश्चय केल्यानंतर ते त्यात झोकून देऊन काम करणे हा भुजबळांचा गुण आहे. भुजबळ यांचे नेतृत्व शून्यातून उभा राहिलेले नेतृत्व आहे. त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्या. शिवसेनेचे नेतृत्व, नगरसेवक, पहिले आमदार, महापौर होत मुंबईचे नेतृत्व त्यांनी केले. पायाभूत विकास केला. देशात विकास करणारा उत्तम राजकारणी म्हणून भुजबळांचा उल्लेख करावा लागेल, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचा गौरव केला.
छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने येथील ‘षण्मुखानंद’ सभागृहात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित ‘बहुजनांचा नायक छगन भुजबळ’ व फोटोबायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष खासदार डॉ. फारुक अब्दुल्ला, जावेद अख्तर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह, गौरव समितीचे प्रमुख खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, ‘‘आज अतिशय आनंदाचा क्षण आहे. कारण याच सभागृहात छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यासाठी बैठक पार पडली. त्यानंतर लगेच त्यांच्याच अध्यक्षतेखाली शिवाजी पार्कवर मेळावादेखील झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटचालीत भुजबळांचे योगदान हे अतिशय महत्त्वाचे आहे. कोणतेही काम हाती घेतले की ते उत्तम व नेटके करायचे, ही छगन भुजबळ यांची खासियत आहे,’’ या शब्दात त्यांनी भुजबळांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.
पवार म्हणाले की, ‘‘छगन भुजबळ हे माझे ज्येष्ठ सहकारी असून, त्यांची ६१ वी व आता अमृत महोत्सवाला मी उपस्थित आहे. मी त्यांच्या कायम पाठिशी आहे. देशात सावित्रीबाई, महात्मा फुले यांचे विचार पुढे नेण्याचे काम भुजबळ करत आहेत. मी ज्या पुणे विद्यापीठात शिक्षण घेतले, त्या विद्यापीठाला फुले यांचे नाव भुजबळांमुळे मिळाले, याचा आनंद आहे.