भुजबळसाहेब, त्यावेळी बडवे आडवे आले नाहीत का?

जयंत पाटील यांचा सवाल
भुजबळसाहेब, त्यावेळी बडवे आडवे आले नाहीत का?

मुंबई : उद्धव ठाकरेंनी ज्यावेळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी पहिल्या टप्प्यात सरकारमध्ये प्रत्येक पक्षाच्या दोन मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यावेळी शरद पवार यांनी तुमच्या नावाची शिफारस केली होती. तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार गटाने एमईटीमध्ये बैठक घेतली. तसेच शरद पवार यांच्याकडून वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बैठक आयोजित केली होती. एमईटी येथे झालेल्या सभेमध्ये अजित पवार यांच्या गटातील नेत्यांनी शरद पवार आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे, असे म्हणत अप्रत्यक्षपणे जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. यावर जयंत पाटील यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले.

जयंत पाटील म्हणाले, ‘‘विठ्ठलाच्या बाजूला बडवे आहेत असे आपण म्हणता, पण तुम्ही दोन वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा पुण्यात शरद पवार यांनी तुमच्या डोक्यावर पगडी ठेवली, तेव्हा बडवे आडवे आले नाहीत. शरद पवार यांनी मंत्रिमंडळात पहिले नाव छगन भुजबळ यांचे घेतले, तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का? असा सवाल जयंत पाटील यांनी केला.
जयंत पाटील यांनी यावेळी अजित पवार आणि भाजपवर निशाणा साधला. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडण्याचा प्रयत्न केला. आमच्यातील काही लोक बाजूला गेले, याचे आम्हाला शल्य आहे. शरद पवारसाहेबांच्या उजवीकडे आणि डावीकडे नेहमी बसणारे आज आमच्यासोबत नाहीत, अशी खंत जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
शरद पवार साहेबांनी अनेक प्रसंगांना तोंड दिले असून, कितीही संकटे आली तरी पवार यांनी खंबीरपणे त्याचा सामना केला आहे. गेल्या पंचवीस वर्षांत असा प्रसंग आला नाही. तरीदेखील अशा संकटांचा सामना आम्ही खंबीरपणे करू, असे पाटील म्हणाले.

गेल्या वर्षी शिवसेनेबाबत जे झाले ते राष्ट्रवादीच्या बाबतीत सुरू आहे. राजकीय पटलावरून विरोधकांना नामशेष करण्याची भूमिका काही लोकांची आहे. त्यामुळे भविष्यात तुमच्याबाबत काय होईल, हे सांगण्याची आवश्यकता नाही, असा सल्ला जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला दिला.

logo
marathi.freepressjournal.in