मुंबई महापालिकेत खांदेपालट! गगराणी यांनी आयुक्तपदाचा, बांगर आणि सैनी यांनी अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला

दीड वर्षापूर्वी नगरविकास विभागाची मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात एक बैठक पार पडली होती. त्यावेळी लवकरच तुमचे पालिकेत दणक्यात स्वागत होईल, असे संकेत मावळते आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते.
मुंबई महापालिकेत खांदेपालट! गगराणी यांनी आयुक्तपदाचा, बांगर आणि सैनी यांनी अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला
नवनियुक्त पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी

मुंबई : दीड वर्षापूर्वी नगरविकास विभागाची मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात एक बैठक पार पडली होती. त्यावेळी लवकरच तुमचे पालिकेत दणक्यात स्वागत होईल, असे संकेत मावळते आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. अखेर दीड वर्षानंतर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून यापुढेही चहल यांचे मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास नवनियुक्त पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी व्यक्त केला. तत्कालीन आयुक्त चहल यांच्याकडून गगराणी यांनी बुधवारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि पी. वेलरासू यांची बदली करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, सहआयुक्त (विशेष) रमेश पवार, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे आदींसह महानगरपालिकेचे विविध वरिष्ठ अधिकारी नव्या आयुक्तांच्या आगमनायाप्रसंगी उपस्थित होते.

डॉ. भूषण गगराणी हे भारतीय प्रशासन सेवेतील सन १९९० च्या तुकडीचे अधिकारी आहेत. संपूर्ण भारतातून तिसऱ्या क्रमांकाने आणि मराठी भाषा घेवून उत्तीर्ण होणारे ते देशातील पहिलेच सनदी अधिकारी (आयएएस) आहेत. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी तसेच इतिहास या विषयातही कला शाखेची पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादित केली आहे. यासह डॉ. गगराणी यांनी नागपूर विद्यापीठातून विधी शाखेची पदवीही संपादन केली आहे. तर लंडन येथील बर्मिंगहॅम विद्यापीठातून प्रशासन या विषयातून त्यांनी व्यवस्थापन शाखेची (एमबीए) पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. यासह मुंबई विद्यापीठातून व्यवस्थापन या विषयात त्यांनी विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी मिळविली आहे. प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर डॉ. गगराणी यांनी सुरुवातीची दोन वर्षे भूमी महसूल व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन, विकास प्रशासन या संदर्भातील कामकाज पाहिले.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे येथे युवक कल्याण आणि क्रीडा विभागाचे संचालक, सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहिले. त्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयात उपसचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाचे (सिडको) व्यवस्थापकीय संचालक अशा वेगवेगळ्या पदांची धुरा सांभाळताना त्यांनी आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटविला.

मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव आणि नगर विकास विभागात प्रधान सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेत नियुक्त होण्यापूर्वी डॉ. भूषण गगराणी मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर कार्यरत होते. तसेच त्यांच्याकडे नगरविकास, जलसंपदा आणि मराठी भाषा या विभागांचीदेखील जबाबदारी होती.

अभिजित बांगर यांनी अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला

मुंबई : जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशी विविध पदांची जबाबदारी पार पाडणारे अभिजित बांगर यांनी बुधवारी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्‍याकडून बांगर यांनी हा पदभार स्‍वीकारला.

पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी बांगर यांचे स्वागत केले. दुसरे नवनियुक्‍त अतिरिक्‍त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपआयुक्त (शिक्षण) चंदा जाधव, प्रमुख कर्मचारी अधिकारी रिमा ढेकणे यांच्‍यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बांगर हे भारतीय प्रशासन सेवेतील २००८ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्‍स अँड इकॉनॉमिक्‍स येथून एम. ए. (अर्थशास्‍त्र) ही पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादित केली आहे. प्रशासकीय सेवेच्या प्रारंभी बांगर यांनी माणगाव (जिल्हा रायगड) येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी कामकाज पाहिले. त्यानंतर जिल्हाधिकारी या नात्याने बांगर यांनी पालघर, अमरावती या जिल्ह्यांची धुरा सांभाळली. तेथून नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त ही पदे सांभाळल्यानंतर अलिकडे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्‍त म्हणून ते कामकाज पाहत होते.

अमित सैनी यांनी सूत्रे स्वीकारली

मुंबई : प्रशासकीय सेवेत विविध पदांवर जबाबदारी पार पाडणारे डॉ. अमित सैनी यांनी बुधवारी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्याकडून डॉ. सैनी यांनी हा पदभार स्वीकारला. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी डॉ. सैनी यांचे स्वागत केले. नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, उपआयुक्त (शिक्षण) चंदा जाधव, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख कर्मचारी अधिकारी रिमा ढेकणे यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते. डॉ. सैनी यांनी एमबीबीएस (मेडिसीन) पदवी संपादित केली आहे. ते भारतीय प्रशासन सेवेतील सन २००७ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. डॉ. सैनी यांनी प्रशासकीय सेवेची सुरुवात रत्नागिरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून केली. त्यानंतर बुलढाणा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली आणि नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. नागपूर येथे कार्यरत असताना विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य सचिव या पदाचा अतिरिक्त कार्यभारदेखील त्यांनी पाहिला.

जिल्हाधिकारी या नात्याने त्यांनी गोंदिया आणि कोल्हापूर या जिल्ह्यांची धुरा सांभाळली. तसेच मुंबई येथे विक्री कर विभागात सहआयुक्त पदावर कामकाज पाहत असताना, महाराष्ट्र राज्य लॉटरी मंडळाच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभारदेखील त्यांनी हाताळला. नंतर महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. अलीकडे ते जलजीवन अभियानाचे संचालक म्हणून कार्यरत होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in