सांडपाणी विक्रीसाठी बड्या कंपन्या मैदानात; एचपीसीएल, बीपीसीएल यांसारख्या बड्या कंपन्या इच्छुक

प्रक्रिया केलेले पाणी उद्यान, मैदान शौचालयात वापरता येणार आहे. तसेच मुंबईतील मोठ्या कंपन्यांतही पिण्याव्यतिरिक्त पाण्याची गरज असते.
सांडपाणी विक्रीसाठी बड्या कंपन्या मैदानात; एचपीसीएल, बीपीसीएल यांसारख्या बड्या कंपन्या इच्छुक

मुंबई : सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पाच मलजल प्रक्रिया केंद्रातील २ कोटी १३ लाख लिटर पाण्याची विक्री करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने मागवलेल्या निविदा प्रक्रियेला एचपीसीएल, बीपीसीएल अशा बड्या कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. दर निश्चितीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून यावर अभ्यास सुरू असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वातावरणीय बदलांमुळे पाऊसही लहरी झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत नसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता बघता, सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी वापरात आणता यावे, यासाठी पाच ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्रे सुरू केली आहेत. याठिकाणी दररोज २ कोटींहून अधिक लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते.

प्रक्रिया केलेले पाणी उद्यान, मैदान शौचालयात वापरता येणार आहे. तसेच मुंबईतील मोठ्या कंपन्यांतही पिण्याव्यतिरिक्त पाण्याची गरज असते. त्यामुळे पाच मलजल प्रक्रिया केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी विक्री करण्यात येणार आहे. पाण्याची विक्री करण्यासाठी दर निश्चित करणे गरजेचे आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने दर निश्चितीसाठी निविदा मागवल्या असता, एचपीसीएल, बीपीसीएलसह पाच बड्या कंपन्यांनी प्रतिसाद दिल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री

कुलाबा - १ कोटी लिटर

बाणगंगा - १० लाख लिटर

चारकोप - ४५ लाख लिटर

माहूल - ४३ लाख लिटर

चेंबूर - १५ लाख लिटर +

एकूण २ कोटी १३ लाख लिटर पाणी

logo
marathi.freepressjournal.in