
दहिसरमध्ये अग्निशमन दलाची भरती सुरू झाली आहे. महिलांसाठी सुरू असलेल्या या भरतीदरम्यान मोठा गोंधळ उडाला आहे. या भरतीत काही तरुणींना अपात्र ठरवण्यात आल्याने या तरुणींनी संताप व्यक्त केला. मैदानातच त्यांनी जोरदार विरोध सुरू केला. आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत या तरुणींनी जोरदार घोषणा दिल्या. तरुणी अचानक आक्रमक झाल्याने भरती प्रक्रिया थांबली. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलक तरुणींना मैदानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुणी अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमार केला. अनेक तरुणींच्या पायाला, हाताला आणि डोक्याला मार लागला. त्यामुळे येथील वातावरण अधिकच तापले.
भरतीसाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागातून तरुणी आल्या होत्या. या मुलींनी गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकला होता. अचानक यावेळी त्यांना त्याच्या उंचीचे कारण देत अपात्र ठरवण्यात आले. अग्निशमन दलाने ठरवून दिलेल्या उंची मर्यादेपेक्षा उंच असूनही तरुणींना डावलण्यात आले. त्यामुळे या तरुणींचा राग अनावर झाला आणि त्यांनी आंदोलन सुरू केली. या तरुणींनी बीएमसी हाय हायच्या घोषणा दिल्या. सर्व तरुणी मैदानात आल्या आणि जोरदार घोषणाबाजी करू लागल्या. या सर्व प्रकरणामुळे भरती प्रक्रिया थांबली. परिसरात अचानक गोंधळ झाल्याने पोलिसांनी तरुणींना पांगवण्यासाठी लाठीमार केला.