जागतिक बाजारातील दबावामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
जागतिक बाजारातील दबावाच्या परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. गुरुवारी गुंतवणूकदारांनी विक्रीचा तुफान मारा केल्याने सेन्सेक्स १४१६ ंकांनी कोसळला. सेन्सेक्स आणि निफ्टी तब्बल २.६० टक्के घसरले. त्याचबरोबर विदेशी गुंतवणूक संस्थांचा विक्रीचा मारा सुरुच आहे.
दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स १४१६.३० अंक किंवा २.६१ टक्के कोसळून ५२,७९२.२३ वर बंद झाला. दिवसभरात तो १५३९.०२ अंक किंवा २.८३ टक्के कोसळला होता. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ४३०.९० अंक किंवा २.६५ टक्के घसरुन १५,८०९.४० वर बंद झाला. तत्पूर्वी, कमकुवत जागतिक संकेतांदरम्यान गुरुवारी उघडताच भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या चौथ्या दिवशी घसरला. मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स ९०० अंक किंवा १.६६ टक्क्यांनी घसरून ५३,३०८ वर उघडला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक २६९ अंकांनी किंवा १.६६ टक्क्यांनी घसरून पुन्हा एकदा १६ हजारांच्या खाली जात १५,९७१ वर उघडला होता. उभय निर्देशांकाचा घसरणीचा कल कायम राहिला.
सेन्सेक्सवर्गवारीत एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रो, टीसीएस, टेक महिंद्रा, टाटा स्टील, इंडस्इंड बँक, कोटक महिंद्रा बँक आदींच्या समभागात मोठी घसरण झाली. तर आयटीसी डॉ. रेड्डीज या दोन समभागांमध्ये वाढ झाली.
आशियाई बाजारात शांघाय वगळता सेऊल आणि टोकियोमध्ये घसरण तर युरोपियन बाजारात दुपारपर्यंत घसरण झाली. अमेरिकन बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणावर घट झाली. अमेरिकन बाजारात झालेला विक्रीचा मारा हा जून २०२० नंतरचा सगळ्यात मोठा होता. जनतेसह गुंतवणूकदारांना आता वाढत्या महागाईची मोठी भीती आहे, असे मोहित निगम, हेड - पीएमएस, हेम सिक्युरिटीजने म्हटले आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.६३ टक्के वधारुन प्रति बॅरलचा भाव ११०.८९ अमेरिकन डॉलर्स झाला. तर विदेशी गुंतवणूक संस्थांकडून विक्रीचा मारा सुरु असून बुधवारी त्यांनी १,२५४.६४ कोटींच्या समभागांची विक्री केली, अशी माहिती शेअर बाजाराने दिली. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल बुधवारी २,५५,७७,४४५.८१ कोटी रुपये असताना गुरुवारी बाजार उघडल्यानंतर झालेल्या घसरणीनंतर ते २,५०,९६,५५५.१२ कोटी रुपयांवर आले असता सुमारे ४.८० लाख कोटी रुपयांची घट झाली. त्यानंतर घसरणीचा कल कायम राहिल्याने बाजार बंद झाला असता गुंतवणूकदारांचे ६.७१ लाख कोटी रुपयांनी नुकसान होऊन २,४९,०६,३९४.०८ बीएसईतील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारमूल्य झाले.