पत्राचाळ घोटाळ्यात आता मोठा ट्विस्ट ; माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख

ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे
पत्राचाळ घोटाळ्यात आता मोठा ट्विस्ट ; माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख
ANI
Published on

पत्राचाळ घोटाळ्यात आता मोठा ट्विस्ट आला आहे. ईडीच्या आरोपपत्रात माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळं आता पत्राचाळ घोटाळ्यात कोणत्या माजी मुख्यमंत्र्याचा हात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. ईडीनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पत्राचाळ घोटाळ्यात नवीन नवीन खुलासे होत आहेत. ईडीने त्यांच्या आरोपपत्रातून दोन गोष्टी समोर ठेवल्या आहेत. यामध्ये २००६-२००७ या काळात एका तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि एक माजी मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळीचा विकास करण्यासाठी आणण्यात आलं होतं. त्यानंतर यामध्ये 1 हजार 34 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं त्या चार्जशिटमध्ये म्हणण्यात आलं आहे.

या प्रकरणामध्ये ज्या काही घडामोडी घडत होत्या त्यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांना माहिती होती, असे देखील सांगण्यात आलं आहे. मात्र, तो माजी मुख्यमंत्री कोण होता, की ज्याच्या नेतृत्वाखाली बैठक झाली, त्याचा उल्लेख मात्र ईडीने आरोपपत्रात केलेला नाही. दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. ईडीने आपल्या आरोपपत्रात खुलासा केला आहे की, पत्राचाळ प्रकरणात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांनी संगनमताने मनी लाँड्रिंग केली आहे.

दरम्यान, ईडीने खुलासा केला आहे की, प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे विश्वासू होते म्हणून त्यांना गुरु आशिष कंपनीत आणण्यात आले. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे जवळचे मित्र असल्याने या प्रकल्पात तेही गुंतले होते. प्रवीण राऊत यांच्याकडे अधिकार होते की, ते कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करू शकता होते. त्यांना म्हाडाशी वाटाघाटी करण्याचे आणि सर्व सरकारी, निमशासकीय, वैधानिक आणि स्थानिक प्राधिकरणांशी संपर्क साधण्याचे काम सोपविण्यात आले होते. संजय राऊत यांच्याशी जवळीक असल्यामुळे प्रवीण राऊत यांनी म्हाडाच्या बहुतांश सरकारी अधिकाऱ्यांशी विविध फायदे मिळवण्यासाठी स्वतः संपर्क साधला. नंतर एफएसआय बिल्डरला विकला. याप्रकरणात राकेश वाधवान, प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांचं आपसात संगनमत होते. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत प्रवीण राऊत यांचा 25 टक्के हिस्सा होता. तरीही यात प्रवीण राऊत हे फक्त एक चेहरा होते. हे सर्व काही संजय राऊत यांच्या नियंत्रणाखाली झालं असल्याचं ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in