मुंबईत बिहार भवन बांधणारच! "राज ठाकरे महाराष्ट्राचे राजे आहेत का?"; बिहारच्या मंत्र्यांनी डिवचलं

मुंबईत कोणत्या राजाची राजवट आहे का, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काय तिकडचे राजे लागून गेले आहेत का, आम्ही कोणत्याही परिस्थितीत मुंबईत बिहार भवन उभारणारच, असे वक्तव्य बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी केले आहे.
मुंबईत बिहार भवन बांधणारच! "राज ठाकरे महाराष्ट्राचे राजे आहेत का?"; बिहारच्या मंत्र्यांनी डिवचलं
Published on

पाटणा : मुंबईत कोणत्या राजाची राजवट आहे का, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काय तिकडचे राजे लागून गेले आहेत का, आम्ही कोणत्याही परिस्थितीत मुंबईत बिहार भवन उभारणारच, असे वक्तव्य बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी केले आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात या प्रश्नावरून संघर्ष पेटण्याची लक्षणे आहेत. मुंबईतील बिहार भवनाला विरोध करणारे फालतू आणि विकृत मानसिकतेचे लोक आहेत. मुंबईत बिहार भवन उभारू देणार नाही, असे हे लोक म्हणतात. महाराष्ट्र कोणाच्या बापाचा आहे का, या देशात कुठेही कोणाचीही जबरदस्ती चालणार नाही, असे वक्तव्यही चौधरी यांनी केले आहे.

पोर्ट ट्रस्टची जागा

मुंबईतील बिहार भवन हे एका विशिष्ट भावनेतून उभारले जात आहे. बिहारमधून अनेक लोक कॅन्सर व अन्य रोगांच्या उपचारासाठी मुंबईत जातात. त्या लोकांच्या सोयीसाठी हे बिहार भवन बांधले जात आहे. अनेक राज्यांमध्ये बिहार भवन आहे. त्याप्रमाणे मुंबईतही बिहार भवन बांधले जाईल, असे अशोक चौधरी यांनी म्हटले. मुंबईतील बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या जागेवर बिहार भवन बांधण्याची योजना आहे. मात्र, मनसेने बिहार भवनाला विरोध केला आहे.

अभ्यंकर यांचे प्रत्युत्तर

अशोक चौधरी यांच्या या टीकेला मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अशोक चौधरी यांनी आधी आपले स्वतःचे राज्य सांभाळावे. दुसऱ्यांना अक्कल शिकवू नये. स्वतःचे राज्य नीट ठेवलीत तर तुमचे लोक बाहेर जाणार नाहीत. देशभरात बिहारबद्दल काय बोलले जाते, हे एकदा अशोक चौधरी यांनी जाणून घ्यावे. महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. देवाने तोंड दिले आहे म्हणून काहीही बोलू नये, असे अविनाश अभ्यंकर यांनी म्हटले आहे.

३० मजली इमारत

दक्षिण मुंबईतील पोर्ट ट्रस्टच्या जागेवर ३० मजली बिहार भवन उभारण्याची योजना आहे. दिल्लीतील बिहार भवनाप्रमाणेच मुंबईतील हे भवनही सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे. येथे शासकीय कामकाजासाठी कार्यालये, बैठकींसाठी ७२ आसनांची सभागृहे, प्रशासकीय विभाग, तसेच अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था उपलब्ध असणार आहे. हा भव्य प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एलफिंस्टन इस्टेट येथे उभारला जाणार आहे.

३१४ कोटी रुपये खर्च

यासाठी सुमारे ०.६८ एकर म्हणजेच २७५२.७७ चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन निश्चित करण्यात आली आहे. या इमारतीसाठी सुमारे ३१४.२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही इमारत पूर्णपणे आधुनिक वास्तूशैलीत उभारली जाणार असून, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. सौर पॅनेल, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी एसटीपी प्रकल्प, तसेच हिरवळीचे क्षेत्र या सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in