विक्रोळी येथे अपघातात बाईकस्वाराचा मृत्यू

उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती पार्कसाईट पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
विक्रोळी येथे अपघातात बाईकस्वाराचा मृत्यू

मुंबई : विक्रोळीतील एका अपघाताच्या घटनेत हितेंद्र विजय तिवारी या १८ वर्षांच्या बाईकस्वार तरुणाचा मृत्यू झाला. भरवेगात बाईक चालविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असून या अपघातात हितेंद्रचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे अपघातानंतर नऊ दिवसांनी हितेंद्रविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. २५ नोव्हेंबरला दुपारी विक्रोळीतील रोड क्रमांक सतरा, प्रबोधनकार ठाकरे उद्यानाजवळ एका तरुणाचा अपघात झाला असून त्याला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती पार्कसाईट पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

रुग्णालयात गेल्यानंतर पोलिसांना जखमी तरुणाचा डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे सांगितले. चौकशीदरम्यान मृत तरुणाचे नाव हितेंद्र तिवारी असल्याचे उघडकीस आले. तो विक्रोळीतील पार्कसाईट, विठ्ठल मंदिरातील शिप्रा सोसायटीमध्ये राहत होता. बाईकवरुन भरवेगात जाताना त्याचा बाईकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने बाईकची दुभाजकाला धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला ओला कारचा चालक इम्रान खुर्शीद सिद्धीकी आणि सुनिता मिरानी यांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची जबानी नोंदवून घेतल्यानंतर या अपघाताला हितेंद्र तिवारी हाच जबाबदार असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या वडिलांना सोपविण्यात आले होते.

हितेंद्र चालवत असलेली बाईक त्याच्या वडिलांची असून त्यांची परवानगी न घेता तो बाईक घेऊन गेला होता. त्याच्याकडे बाईक चालविण्याचा परवाना नव्हता. बाईक चालविताना त्याने हेल्मेट घातले नव्हते. तरीही वाहतूक नियमांचे उल्लघंन करुन त्याने बाईक भरवेगात चालविण्याचा प्रयत्न केला आणि त्यात अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला. अपघाताचा चौकशी अहवाल नंतर पोलिसांनी वरिष्ठांना सादर केला होता. या चौकशीनंतर नऊ दिवसांनी हितेंद्र तिवारीविरुद्ध सोमवारी ४ डिसेंबरला पार्कसाईट पोलिसांनी हलगर्जीपणा बाईक चालवून स्वतच्याच मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

logo
marathi.freepressjournal.in