
मुंबई : भरवेगात जाणाऱ्या कारची धडक लागून एका बाईकस्वाराचा मृत्यू झाला तर भाऊ-बहिण जखमी झाले. अपघातानंतर कारचालकाने पलायन केले असून त्याच्याविरुद्ध सांताक्रुझ पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अनंती येसू संखे असे मृताचे नाव असून देवांश कांतीलाल शहा आणि त्यांची बहिण पूजा कांतीलाल शहा हे जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता सांताक्रुझ येथील पोदार शाळेसमोर देवांग आणि पूजा त्यांच्या कारमध्ये बसले होते. त्यावेळी समोरून भरवेगात येणाऱ्या क्रेटा कारने पहिल्यांदा बाईकला नंतर त्यांच्या कारला जोरात धडक दिली. या अपघातात तिघेही जखमी झाले होते. जखमींना स्थानिक लोकांनी तातडीने सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे अनंती येसू संखे (५०) या बाईकस्वाराला डॉक्टरांनी मृत घोषित केले. उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत.