Video : मुंबईतील 'या' अब्जाधीशांनी वेळ वाचवण्यासाठी चक्क लोकल पकडली, ट्रॅफिकला मात दिली

उल्हासनगर येथे जाण्यासाठी आपल्या एकाहून एक आलिशान गाड्या सोडून चक्क लोकलमधून प्रवास केला.
Video : मुंबईतील 'या' अब्जाधीशांनी वेळ वाचवण्यासाठी चक्क लोकल पकडली, ट्रॅफिकला मात दिली
Published on

अब्जाधीश उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांनी शुक्रवारी उल्हासनगर येथे जाण्यासाठी आपल्या एकाहून एक आलिशान गाड्या सोडून चक्क लोकलमधून प्रवास केला. मुंबईच्या 'कुप्रसिद्ध' वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी ट्रेनचा पर्याय निवडल्याचे ते म्हणाले. हिरानंदानी ग्रुपचे 73 वर्षीय सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालकांनी स्वतःच्या उल्हासनगरच्या प्रवासाची झलक दाखवणारा व्हिडिओ Instagram वर शेअर करताच तुफान व्हायरल झाला आहे.

निरंजन हिरानंदानी म्हणाले की, त्यांनी वेळ वाचवण्यासाठी आणि मुंबईच्या 'कुप्रसिद्ध' वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून लोकल पकडली. "वेळेची बचत आणि शहराच्या लाइफलाइनसह रहदारीवर मात करत एसी लोकलमधून मुंबई ते उल्हासनगर हा प्रवास एक वैयक्तिक 'अभ्यासपूर्ण अनुभव' होता", असे त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले. व्हिडिओमध्ये ते सामान्य प्रवाशांप्रमाणे प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट बघताना आणि नंतर एसी कोचमध्ये चढताना दिसत आहेत. हिरानंदानी यांना लोकलने प्रवास करताना बघून उपस्थित प्रवासीही अवाक् झाले होते. या प्रवासात त्यांनी सहप्रवाशांसोबत विविध विषयांवर मनसोक्त गप्पाही मारल्या. यावेळी हिरानंदानींसोबत त्यांच्या टीममधील काही सदस्यही होते.

अवघ्या एका दिवसातच त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओला इंस्टाग्रामवर तब्बल 7 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. सार्वजनिक वाहतूक वापरल्याबद्दल अनेक नेटकरी कमेंट्समध्ये अब्जाधीशांचे कौतुक करीत आहेत. "हे खूप छान आहे. जास्तीत जास्त उद्योजकांनी सार्वजनिक वाहतूक वापरावी, ज्यामुळे सरकारला लोकांना चांगल्या सेवा देण्याचे प्रोत्साहन मिळेल”, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. दरम्यान, दिव्यांग, गर्भवती महिला आणि कर्करोगग्रस्तांसाठी राखीव डब्ब्यातून प्रवास केल्याकडे काहींनी लक्ष वेधले असले तरीही “सर तुमच्या साधेपणाचा आदर आहे,” अशा शब्दांत बहुतांश नेटकरी कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in