कचऱ्यापासून बायोगॅस अन् खतनिर्मिती ;कचरामुक्त मुंबईसाठी पालिकेचा पुढाकार

कचरामुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिकेने २ ऑक्टोबर २०१७ पासून सोसायट्यांना कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले
कचऱ्यापासून बायोगॅस अन् खतनिर्मिती ;कचरामुक्त मुंबईसाठी पालिकेचा पुढाकार

मुंबई : कचरामुक्त मुंबईसाठी मुंबईसाठी महालक्ष्मी, गोराई या केंद्रावर कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया, बायोगॅस अन् खतनिर्मिती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या केंद्रांवरून डंपिंग ग्राऊंडवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी होणार असून दुर्गंधीसारख्या समस्याही कमी होण्यास मदत होणार आहे.

कचरामुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिकेने २ ऑक्टोबर २०१७ पासून सोसायट्यांना कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले. यामध्ये २० हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आणि १०० किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या इमारती-आस्थापनांना ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच २०३० पर्यंत कचरामुक्त मुंबई हे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे. यामध्ये आता महालक्ष्मी आणि गोराई कचरा स्थानांतरण केंद्रावर अद्ययावत पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. महालक्ष्मी येथे दररोज महालक्ष्मी केंद्रावर दररोज ६२५ मेट्रिक टन तर गोराई ३५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. यासाठी आराखडा तयार करण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत.

अशी आहे कचऱ्याची स्थिती

मुंबईतील ६ हजार मेट्रिक टनांच्या कचर्‍यापैकी सुमारे २ हजार मेट्रिक टन कचरा हा सहा ठिकाणी असणार्‍या कचरा हस्तांतरण केंद्रांवर छोट्या वाहनांमधून जमा केला जातो. यानंतर मोठ्या वाहनांमधून डंपिंग ग्राऊंडवर नेऊन विल्हेवाट लावली जाते. मात्र वर्सोवा, गोराई, कुर्ला आणि महालक्ष्मी येथे असणार्‍या कचरा हस्तांतरण केंद्रांच्या ठिकाणी जमा होणार्‍या कचर्‍यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते. शिवाय रोगराई पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे या ठिकाणी कचरा पुनप्रक्रिया करणारी ‘आदर्श कचरा हस्तांतरण केंद्र’ बनवण्यात येणार आहेत.

दुर्गंधी, रोगराईचा धोका टळणार

कचरा हस्तांतरण केंद्रावर येणाऱ्या कचऱ्याचे सुका कचरा, ओला कचरा असे विलगीकरण होईल. यानंतर प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून पायरोलेसिस तंत्रज्ञानाने प्रक्रिया करून इंधन ऑईल तयार होईल. शिवाय टाईल्स, पेव्हर ब्लॉक, विटा अशा वस्तू बनवल्या जातील. ओल्या कचऱ्यापासून खत आणि बायोगॅस प्रकल्प उभारले जातील. ही सर्व कामे कचरा हस्तांतरण केंद्र बंदिस्त करून केली जाणार असल्यामुळे परिसरातील दुर्गंधी, रोगराईचा धोका टळेल. नारळाच्या शहाळांपासून डोअर मॅट, दोऱ्या, कोकोपिट अशा अनेक वस्तू बनवल्या जाणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in